लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हळ, रा.कुर्ला, मुंबई यांचा ११ रोजी बिलगाव येथे धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ओव्हळ हे संघटनात्मक कामासाठी धडगाव तालुक्यात गेले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक बांधणीसाठी दोन दिवसांपासून राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हळ हे पदाधिकाऱ्यांसह जिल्हा दौऱ्यावर आले होते. १० रोजी त्यांनी नंदुरबारातील पदाधिकारऱ्यांनी गाठीभेटी घेतल्यानंतर ते धडगाव तालुक्याच्या दौऱ्यावर गेले. कार्यकर्त्यांशी संघटनात्मक बाबींवर चर्चा केल्यानंतर त्यांना बिलगाव येथील प्रसिद्ध १२ धाऱ्या धबधब्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तो पहाण्यासाठी सोबतचे पदाधिकारी विलास रवींद्र ठाकरे, रा.नंदुरबार, निलेश संजय हिरे, रा.नंदुरबार, प्रितम प्रविण निकम, रा.शहादा, शुभम स्वामी, रा.लातूर, पद्माकर वळवी, रा.असली, ता.धडगाव यांच्यासोबत बिलगाव येथे दुपारी १२ वाजता पोहचले. तेथे धबधब्याखाली त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून ते पडल्याने बुडाले. त्यांच्यासोबतच्या इतरांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी तातडीने धडगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. धडगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. ही घटना कळाल्यानंतर नंदुरबार व शहादा येथील अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी धडगावकडे धाव घेतली. सायंकाळी उशीरापर्यंत पोलिसात घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.
अभाविचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हळ यांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:31 IST