नंदुरबार वार्तापत्र
मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या वर्षी झालेला सरासरीपेक्षा अधीक पाऊस, सिंचनाच्या वाढलेल्या सुविधा यामुळे यंदाचा ऊस गळीत हंगाम तिन्ही साखर कारखान्यांसाठी गोड होणार आहे. खान्देशात सर्वाधिक साखर कारखाने सुरू होणारा नंदुरबार हा एकमेव जिल्हा आहे. यंदा मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध असल्यामुळे पळवापळवी होणार नाही. बाहेरील कारखाने ऊस घेण्यासाठी येणार नाहीत. त्यामुळे यंदा तिन्ही साखर कारखाने आपल्या उद्दीष्टानुसार गाळप करतील हे स्पष्ट आहे. गेल्या अनेक वर्षानंतर अशी समाधानकारक परिस्थिती आली आहे. असे असले तरी ऊस उत्पादकांना वेळेवर पेमेंट होणे आणि वेळेवर ऊसाची तोड होणे याकडे या कारखान्यांच्या व्यवस्थापनांना पहावे लागणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. सातपुडा साखर कारखाना पाच हजार मे.टन दैनंदिन गाळप क्षमतेचा, खाजगी तत्वावरील आयान शुगर कारखाना आता आठ हजार मे.टन दैनंदिन गाळप क्षमता असलेला होणार आहे. तर नवापूरचा आदिवासी साखर कारखाना साडेबाराशे मे.टन गाळप क्षमतेचा आहे. याशिवाय जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या गुजरातमधील दोन तर मध्यप्रदेशातील एक खांडसरी आहे. खान्देशात केवळ नंदुरबार जिल्ह्यातच अस्तित्वात असलेले सर्वच कारखाने सुरू होणार आहेत. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात ऊसाचे क्षेत्र कमी झाले होते. त्याला कारण पाण्याची कमतरता, विविध रोगांचा, किडीचा प्रार्दुर्भाव, दराबाबत नाराजी ही कारणे होती. परंतु गेल्या काही वर्षात ऊसाला चांगला दर मिळू लागला आहे. पाण्याची उपलब्धताही वाढल्याने शेतकरी पुन्हा ऊसाकडे वळला आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी, कुपनलिका आटल्या नाहीत. त्यामुळे ऊस लागवड वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात जवळपास ४० ते ४२ हजार एकर ऊस आहे. तिन्ही साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात नोंदणी केली आहे. त्यामुळे उद्दीष्टाइतके गाळप तिन्ही साखर कारखाने करणार हे निश्चित आहे. गेल्या काही वर्षात कमी ऊसामुळे ऊसाची पळवापळवी होत होती. शेतकरी जिल्हाबाहेरील कारखान्यांच्या जादा दराच्या अमिषाला बळी पडत होते. अनेक शेतकऱ्यांचे पेमेंट अशा कारखान्यांकडे अडकले होते. त्यासाठी आंदोलन करावे लागले, शासन दरबारी चकरा माराव्या लागल्या. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आता बाहेरील कारखान्यांना ऊस देण्याबाबत कानावर हात ठेवले असल्याचे गेल्या दोन ते तीन वर्षातील चित्र आहे. यंदा सातपुडा साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्यात आघाडी घेतली. गेल्या आठवड्यात कारखान्याचा गाळप शुभारंभ झाला. आयान शुगरही लवकरच सुरू होत आहे. दोन दिवसात आदिवासी कारखाना सुरू होणार आहे. तिन्ही साखर कारखाने सुरू झाल्याने या कारखान्यांमध्ये आलेले ऊसतोड मजूर, तेथील कामगार, व्यावसायिक, ऊसतोड वाहतूक करणारे वाहने व त्यातील कर्मचारी या सर्वांमुळे परिसरात रौनक आली आहे. त्याचा परिणाम शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा येथील बाजारपेठेत देखीेल उलाढाल वाढली आहे. चार ते पाच महिने ही रौनक कायम राहणार असल्यामुळे व्यापारी वर्ग देखील समाधानी असतो. सातपुडा साखर कारखान्याने २,३६५ रुपये ऊसाला दर जाहीर केला आहे. आयान शुगर कारखान्याचा दर घोषीत होणे बाकी आहे. आदिवासी साखर कारखान्याच्या दराकडेही लक्ष लागून आहे. यंदा जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने पुर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. सर्वच शेतकऱ्यांची ऊसाची तोड वेळेवर होईल, जवळचे व लांबचे असा भेद न करता सर्वांना समान न्यायाने तोडसाठी मदत होईल याकडे साखर कारखाना व्यवस्थापनांनी पहाणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा मार्च, एप्रिलनंतर शेतकरी ऊस तोडीसाठी विविध पर्यायांचा वापर करतात ते होऊ नये अशी अपेक्षा आहेच. एकुणच यंदा साखर हंगाम तिन्ही कारखान्यांसाठी ‘गोड’ राहणार यात शंका नाही.