लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोना या जीवघेण्या साथीची लाट पसरल्यामुळे शासनाच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील आठवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा १५ जुलैपासून जवळपास सर्वच ठिकाणी सुरू झाल्या आहेत. तथापि ही लाट अजून पूर्णपणे कमी झालेली नाही. अशा विदारक स्थितीत केवळ आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी ती माता स्वतःच्या काळजावर दगड ठेवून त्यांना शाळेत पाठवत असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा फटका लहान बालकांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच बसला होता. यातून कसे बसे सावरत यंदा तरी ते सुरळीत होईल, याची आशा पालकांना लागून होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या लाटेने पालकांच्या आशेवर पूर्ण पाणी फेरले. आता त्याची लाट ओसरली असल्यामुळे राज्य सरकारने ज्या ठिकाणी एकही रुग्ण नाही, अशा ठिकाणी १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवण्याबाबत पालकांचे दुमत आहे. त्याबाबत अजूनही त्यांच्या मनात भीती आहे. विशेषत: मातांमध्ये हे चित्र प्रकर्षाने जाणवते. केवळ आपल्या बालकाचे शिक्षण बुडू नये, तो त्यापासून वंचित न राहता त्याच्यावर विपरित परिणाम होऊ नये, या एकमेव काळजीपोटी आपल्या काळजावर दगड ठेवून मोठ्या अंतःकरणाने त्यांना शाळेत पाठवावे लागत असल्याची व्यथा काही मातांनी बोलून दाखवली आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षीदेखील मुलांच्या शिक्षणात मोठा खंड पडला होता. ऑनलाईन शिक्षणाचा फारसा उपयोग झाला नाही. यंदा त्याचे वातावरण निवळेल, अशी अशा होती. परंतु प्रचंड वाढले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजूनही मुलांना शाळेत पाठवण्याबाबत मनात धाकधूक आहेच. शिक्षण महत्त्वाचं असल्याने नाईलाजास्तव पाठवावे लागत आहे. - गायत्री जगदाळे, रांझणी, ता. तळोदा.
या जीवघेण्या कोरोनाची साथ केव्हा जाईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे आता आपल्याही जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. हा दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यांना त्याबाबतची जाणीव करून मुलांना शाळेत पाठवत आहे. तरीही मुले घरी येईपर्यंत काळजी असतेच. -पूजा चव्हाण, तळोदा.
कोरोनाची प्रचंड दहशत मनात आहे. मात्र, शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे आहे. बाल वयात मुलगा शिक्षणापासून लांब राहिला तर त्याच्यावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे मनात कटुता असताना त्याला शाळेत पाठवावे लागत आहे. - सुवर्णा शिंदे, आई, मोड, ता. तळोदा.
शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघोळ करा
शाळा सुटल्यानंतर आपली मुले, मुली घरी सुरक्षित येण्याची वाट सर्वच आया आतुरतेने पाहात असतात. त्यापूर्वी आंघोळीसाठी गरम पाणी करून ठेवलेलेच असते. कपडे काढून त्याला लगेच आंघोळ घातली जाते. त्यापूर्वी शाळेत आपल्या पाल्यांना पाठवताना प्रत्येक माता सॅनिटायझर, मास्क, पाण्याची बाटली या वस्तू सोबत देऊन वर्गात सामाजिक अंतर राखण्याची जाणीव करून देत असल्याचे सांगतात. कोरोनामुळे बालकांना आंघोळ घालण्याचा नित्यक्रम झाल्याचे काही मातांनी बोलून दाखवले. कोरोनाबरोबर चालायची सवय आता लावून घ्यावी लागणार असल्याचे मातांनी सांगितले.
अ) मास्क काढू नये. ब) वारंवार साबणाने हात धुवावा किंवा सॅनिटायझर वापरावे. क) सोशल डिस्टन्सिंग पाळावे. ड) शाळेतून आल्यावर कपडे धुवायला काढणे व आंघोळ करावी.
जिल्ह्यातील एकूण शाळा
३६२ असून, त्यात १५ जुलै रोजी पहिल्या दिवशी १८९ सुरू, तर १७३ शाळा बंद होत्या.