नरेंद्र गुरव ।लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा हे गाव दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. या गावात भुयार पडणे, खोदकाम करताना काळ्या पाषाणातील विविध देवदेवतांच्या मूर्ती निघणे, पुरातन काळातील चांदीचे शिक्के (नाणी) हंड्यातून निघणे आदी घटना अधूनमधून घडत असल्याने त्यावर आता संशोधन होणे गरजेचे झाल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनांमुळे इतिहासातील अभ्यासकांच्या उत्सुकता वाढल्या आहेत.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा गावाची भौगोलिक स्थिती पाहिली तर गाव उंच-सखल भागावर वसले आहे. गावातील गढी, नागबरडा, मुंजडाहाटी, सिलावत बर्डी हे सर्व उंच टेकडीवर आहे तर गावचा काही भाग हा खाली आहे. आजही प्रकाशा गावाच्या दक्षिणेला मातीचा भला मोठा डोंगर आहे. त्यात अजूनही पुरातन काळातील बांधकामाचे अवशेष, माठ, विटा आढळून येतात. गावाच्या पूर्वेलाही मातीचा डोंगर आहे. त्याच्यावर आता वस्ती झाली आहे. गाव उंच-सखल भागावर असल्याने याठिकाणी भुयारी फार पडतात. प्रकाशा येथे ३ ऑक्टोबर रोजी उपसरपंच भरत पाटील व माजी जि.प . सदस्य रामचंद्र पाटील यांच्या अंगणामध्ये पहाटेच्या सुमारास अचानक भुयार पडले होते. या भुयाराचा व्यास तीन फुटाचा होता तर खोली ४० ते ५० फुटाची होती. विशेष म्णणजे हे भुयार विटांचे बांधकामाचे दिसून आले. मात्र यात खालील तळापासून तर वरपर्यंत सुमारे आठ फूट पाणी भरले होते. सुदैवाने दुर्घटना टळली असली तरी मात्र भुयार पडणे आता काही नवीन नाही. याआधीही २००२ मध्ये कुंभार गल्लीतील छोटू मंगळू पाटील यांच्या घरासमोरील अंगणात पहाटे अचानक भुयार पडले होते. ते पाहण्यासाठी स्वतः हे दाम्त्यप गेले असता दोघे जण त्या भुयारात पडले होते. लोकांनी सुखरूप त्यांना बाहेर काढले होते. सप्टेंबर २०१२ मध्येही टोपलाजी वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ असेच एक भुयार पडले. त्याचा व्यास दोन फुटाचा होता व खोली १५० ते २०० फुटाची होती. याठिकाणी कदाचित विहीर असावी, असे जुने जाणकार सांगत होते. मात्र त्याचे संशोधन न करता हे भुयार बुजवण्यात आले. त्याचवर्षी भोई गल्लीतील हिरालाल छोटू भोई यांच्या घराच्या पायरीजवळदेखील भुयार पडले होते. एक फुटाचा व्यास व ६० फूट खोल अशी या भुयाराची रचना होती. यावेळीदेखील प्रशासनातर्फे पाहणी करण्यात आली. मात्र त्याचे संशोधन न होता बुजून देण्यात आले. २४ जानेवारी २०१८ ला प्रकाशा येथील भैरव चौकाकडून गौतमेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावर सदा भोई यांच्या घराच्या मागील बाजूस जेसीबीने खोदकाम सुरू असताना खंडित दोन मुर्ती निघाल्या होत्या. या मूर्ती एक विष्णूची आणि एक लक्ष्मीची होती. साधारण पाच ते सहा फूट उंचीच्या या मूर्ती खंडित होत्या. दोन्ही मूर्ती सुंदर आकर्षक घडवलेल्या होत्या. त्यात विष्णूच्या मूर्तीच्या मागे सूर्य, कानात कुंडल, गळ्यात हार होता तर देवीची मूर्तीदेखील कळ्या पाषाणातील होती. उजव्या हातात त्रिशूळ, आणि डाव्या हातात तलवार होती. पायाखाली राक्षस होता. या दोन्ही मूर्ती धुळे येथील राजवाडे संशोधन केंद्र यांनी दुसऱ्या दिवशी येथून नेल्या आहेत. १९७२ साली प्रकाशा गावात पाण्याची पाईपलाईन ग्रामपंचायतीकडून टाकली जात असताना न्हावी गल्लीमध्ये खोदकाम सुरू असताना अचानक विष्णूची व कानुमातेची मूर्ती निघाली. विष्णूची मूर्ती निघताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. विष्णूची मूर्ती अखंड पाच ते सहा फूट उंचीची सुंदर व आकर्षक देखणी होती. त्या मूर्तीला तेथील रहिवाशांनी एक मंदिर बनवून तिथे स्थापन केले आहे. १४ सप्टेंबर २०२० रोजी शांताबाई मोरे यांच्या घराचे खोदकाम सुरू असताना अचानक पुरातन काळातील मातीचे एक मडके हाती लागले. त्यात कोळसा भरला होता. मात्र हाताला जड लागले म्हणून काय आहे हे पाहण्यासाठी कोळसा बाजूला केला असता त्याच्यात चक्क १०० चांदीची नाणी होती. मोजून पाहिले असता ते १०० निघाले. जवळून पाहिले असता राणी व्हिक्टोरिया यांचे चित्र दिसले. शिक्क्यामागे ‘वन रुपीज’ असं लिहिलेले आहे. त्यात काही १७०० तर काही १८०० या काळातील उल्लेख आहे. यावरून इंग्रज काळातील ती असावी असा कयास लावण्यात आला. या नाण्यांचा पंचनामा झाला आणि महसूल विभागा शहादा यांनी जिल्हा कोषागार कार्यालय नंदुरबार येथे रात्री उशिरापर्यंत जमा केले.
प्रकाशातील उत्खननामुळे इतिहासाला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:07 IST