लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी होणारी दिवाळी यंदा महागाईचा तडका लावणारी आहे. किराणा मालात भरमसाठ दरवाढ झाल्याने यंदा फराळाचे पदार्थ तयार करताना गृहिणी बजेटवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत. यातून आचारीपेक्षा बचत गटांकडे गृहिणी धाव घेत आहेत. नंदुरबार शहरात तूर्तास सात ते आठ बचत गट हे फराळ तयार करुन देत आहेत. हे सर्वच गट एकमेकांसोबत जुळले असून गटांतील सदस्य महिलांनाही महागाईमुळे अडचणी येत आहेत. तेल, साजूक तूप, वनस्पती तूप, रवा, मैदा, बेसन, गूळ आणि खसखस या प्रमुख पदार्थांचे दर वाढले असल्याने बचत गट निर्मित फराळाचे दरही वाढले आहेत. घाऊक बाजारातील ह्या वस्तू साठा करुन ठेवू शकत नसल्याने बचत गटांना आताच्या दरातील वस्तू खरेदी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून आले आहे. महागाई असली तरीही बहुतांश गृहिणी ह्या बचत गटांच्या मालाला अधिक पसंती देत असल्याचे चित्र सध्या बाजारात आहे. बाजारातील मिठाई विक्रेत्यांकडेही दरवाढ झाल्याचे दिसून आले आहे.
काेराेनाच्या भीतीनेआचारींकडे जाणे टाळले नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश महिलांनी यंदा घरगुती पद्धतीने फराळ तयार करण्यासह बचत गटांकडे धाव घेतली आहे. बाहेरगावाहून येणारे आचारींना कोरोनामुळे नाकारण्यात आले आहे. यामुळे गल्लोगल्ली लागणारे फराळ तयार करणा-यांचे स्टाॅल्स यंदा दिसून येत नाहीत. बहुतांश राजस्थानी आचारीही गावाहून परतलेले नसल्याने हा व्यवसाय काहीसा थंड आहे.
दिवाळीपूर्वी जीवनावश्यक वस्तूंसह फराळ तयार करण्यासाठी लागणा-या वस्तूंचे दर आवाक्यात होते. यामुळे दिलासा होता. या वस्तू साठा करुन ठेवू शकत नसल्याने गटांनी आता खरेदी सुरू केली आहे. परंतू वाढीव दराने माल घ्यावा लागत असल्याने तयार होणा-या फराळाचे दरही आपसूक वाढले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे दर १० टक्के वाढले आहेत. - जयश्री कासार, अध्यक्षा, सहेली बचत गट, नंदुरबार.
बुंदी तयार करणेही महागल्याने चिंता दिवाळीच्या काळात मोतीचूर लाडूंना मोठी मागणी असते. डाळीचे पीठ, तूप आणि साखरेपासून तयार होणारी बुंदी एकत्र करुन त्याचे लाडू तयार केले जातात. यंदा तेलासह सर्व गोष्टींचे भाव वाढल्याने मोतीचूर लाडूचे दरही वाढले आहेत. बचत गटांसह मिठाई विक्रेत्यांकडेही माेतीचूरचे दर वाढले आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अनारसे व शंकरपाळे यांचे दरही वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरातील विविध बचत गटांकडून अनारसे तयार करुन दिले जातात. महागाईवर मार्ग काढत काही महिला बचत गटांनी ग्राहकांचे साहित्य घेत फराळ तयार करुन देण्याचे काम हाती घेतले आहे. यात मजूरी म्हणून प्रत्येक पदार्थाच्या किलोमागील दरांनुसार मजूरी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.