नंदुरबार : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात अनेकविध समस्या सतावत आहेत. बालविवाहासारख्या गंभीर समस्येने या काळात पुन्हा डोके वर काढल्याचे समोर आले होते; परंतु महिला बालविकास विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने चार बालविवाहांना चाप बसून मुलींना जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे.
कोरोनाकाळात चाइल्डलाइन, बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती यांनी कारवाईचा धडाका लावल्याने सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा, मध्यप्रदेशातील खेतिया परिसर, तळोदा व प्रकाशा, ता. शहादा येथे होऊ घातलेले बालविवाह रोखले गेले आहेत. कोरोनाकाळातील बेरोजगारी, तसेच आर्थिक चणचण यातून पालकांनी कमी खर्चात विवाह होतो या सबबीखाली हे विवाह नियोजित केले होते; परंतु मुलींचे वयच कमी असल्याचे समोर आल्यानंतर ते विवाह रद्द करून पालकांना समज देण्यात आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात सातत्याने जाणीवजागृती सुरू असते. बालविवाह होत असेल तर नागरिकांनी चाइल्डलाइनशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी कळविले आहे.
जुन्या चालीरीतींमुळे काही समाजांमध्ये बालविवाहाचे प्रमाण आजही मोठे आहे. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर चाइल्डलाइनकडे तक्रारी दाखल होतात. त्यानंतर चाइल्डलाइन, बालसंरक्षण कक्ष आणि पोलिसांचे पथक बालविवाह रोखतात. त्यानंतर बालकल्याण समितीमार्फत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो, अशी माहिती चाइल्डलाइनचे समन्वयक आशिष शेवाळे यांनी दिली. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील अमलीपाडा येथे गेल्या १५ दिवसांपूर्वीच एक विवाह थांबविण्यात आला. यात मुलगी १४ वर्षांची, तर मुलगा अवघा १६ वर्षांचा होता. जिल्हा महिला समुपदेशन कक्षाच्या सुमित्रा वसावे यांनी हा विवाह थांबविला होता. यातील मुलीला खापर येथील कस्तुरबा गांधी विद्यालयातही प्रवेश मिळवून देण्यात आला आहे.
मुलींची संख्या कमी
जिल्ह्यात माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुलांच्या तुलनेत मुलींची पटसंख्या कमी असल्याचे दिसून आले आहे. पटसंख्या कमी होण्यास इतरही अनेक कारणे आहेत. ग्रामीण भागातील बऱ्याच मुलींची शाळा सुटली आहे. या मुलींचे शिक्षण सुरू होण्याची आवश्यकता आहे.
विवाह रोखण्यासाठी सेविकांची मदत
कोरोनाकाळात बालविवाह करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले असले तरी पुन्हा ते होऊ नयेत यासाठी महिला बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविका व सरपंच यांच्या दर महिन्याला बैठका घेऊन गावातील विवाहांची माहिती घेतली जाणार आहे.
मुलगी म्हणजे चिंता म्हणून...
जिल्ह्यात यापूर्वी झालेले बालविवाह हे केवळ पालकांची मुलींप्रती असलेली चिंता यातून झालेले आहेत. चांगले स्थळ मिळत नाही, म्हणून जे आले ते चांगले असा विचार करून मुलींचा अल्पवयात विवाह करण्याचा घाट घातला जातो.
बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने सर्व स्तरावर सूचना केल्या आहेत. विभागाकडून वारंवार सामाजिक संस्थांच्या संपर्कात राहून बालविवाहांचा आढावा घेतला जातो.
- उमेश पाडवी
जिल्हा समन्वयक, नंदुरबार
काही समाजातील जुन्या चालीरीतींमुळे बालविवाहाचे प्रमाण आजही मोठे आहे. मुलगी मोठी झाली तर मुलगा भेटणार नाही अशी भीती असते; परंतु पालकांनी लहान वयात मुलींचे लग्न करू नये.
-राहुल जगताप
जिल्हा महिला समुपदेशन कक्ष