लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पोलीस पट्ट्याने मारतात, या भितीने गारद झालेल्या फसवणूक प्रकरणातील संशयिताने भिवंडी ते शहादा प्रवासादरम्यानच उद्योजकाच्या खात्यावर २६ लाख रूपये भरून देत स्वत:ची सुटका करुन घेतली. गेल्या काही १० दिवसांपूर्वीच शहादा येथील कृषी उद्योजकाची ६४ लाख रूपयात फसवणूक झाल्याचे हे प्रकरण आहे. शहादा येथील किशोर नरोत्तम पाटील यांच्याकडून भिवंडी येथील एका फार्मा कंपनीने चार टन पेपिन्स नावाचा पदार्थ खरेदी केला होता. यापोटी ऑगस्ट २०१९ पासून कंपनीकडून किशोर पाटील यांना ६३ लाख रूपये देणे होते. परंतू त्यांच्याकडून ही रक्कम देण्यास सातत्याने टाळाटाळ करण्यात येत होती. पाटील यांनी मागणी करुनही रक्कम मिळत नसल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली होती. त्यांच्या फिर्यादीवरुन पलक अभय केन्या, अभय अरूण केन्या, अरुण कुमार केन्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने थेट भिवंडी येथे जाऊन केन्या बंधूंची चाैकशी केली होती. यातील एकास सहायक पोलीस निरीक्षक वाघ हे ताब्यात घेऊन शहाद्याकडे निघाले होते. दरम्यान त्याने पोलीसीमारापासून बचाव करत २६ लाख रूपये किशोर पाटील यांच्या खात्यावर जमा करुन देत सुटका करवून घेतली आहे. याप्रकरणात किशोर पाटील यांचा चार टन माल खराब असल्याचे सांगून तिघांनी फसवणूक केली होती. दरम्यान आधी पाच लाख त्यांनी पाटील यांना दिले होते. परंतू नंतर २६ लाख देण्यासाठी टाळाटाळ करत होते. सोबतच पाच टन पेपीन्सची ऑर्डर देत त्याची उचल न केल्याने नुकसान झाले होते. यामुळे एकूण ६३ लाख रूपयांच्या फसवणूकीची फिर्याद पोलीसात देण्यात आली होती.
पोलीस पट्ट्याने मारतात या भितीने अर्ध्या रस्त्यातच केले ट्रान्झॅक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 13:12 IST