खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांची पेरणी पूर्व तयारी सुरू आहे. सद्य:स्थितीत लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना शहरामध्ये येऊन खत खरेदी करणे जिकिरीचे जात आहे. त्यात खत खरेदी ही आधारकार्ड लिंकिंग झाल्यामुळे व शेतकऱ्यांना त्यासाठी थंब देणे बंधनकारक असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. यामुळे वैयक्तिक शेतकऱ्याला खते खरेदी करणे जिकिरीचे जात आहे. अशा परिस्थितीत गटाच्या माध्यमातून खते खरेदी केल्यास हा त्रास कमी व्हावा, तसेच शहरामध्ये होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने पुढाकार घेऊन गटाच्या माध्यमातून बांधावर खत पोहोचविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
नंदुरबार तालुुक्यात कापूस हे प्रमुख पीक असून, सुमारे ४८ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड होणे अपेक्षित आहे. याशिवाय खरीप ज्वारी सात हजार ६३७ हेक्टर, मका तीन हजार ५८० हेक्टर, मिरची दाेन हजार ७८० हेक्टर, पपई एक हजार २९४, केळी ४५० हेक्टर व इतर पिकांसह नंदुरबार तालुक्यात खरीप हंगामामध्ये सुमारे ७० हजार ९७३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणे अपेक्षित आहे. या क्षेत्रासाठी युरिया १७ हजार ४० मे. टन, डीएपी एक हजार ९२० टन, पोट्यॅश एक हजार ९२० टन, संयुक्त खते सहा हजार ४७० मे. टन तसेच सिंगल सुपर फॉस्फेट सुमारे तीन हजार ४८० मे.टन खतांची आवश्यकता आहे. या प्रमाणात तालुक्याला खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून, तालुक्यासाठी कोणताही तुटवडा होणार नाही, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी विजय माहिते यांनी दिली. विकेल ते पिकेल, एक गाव एक वाण, गट शेती योजना, विक्री व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या योजना गटांच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याने कृषी निविष्ठाही गटांच्या माध्यमातून खरेदी केल्यास वाहतूक खर्चामध्ये बचत होऊन कमी किमतींमध्ये शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
याचबरोबर रासायनिक खतांच्या भरमसाट वापरामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत. तसेच उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर राज्यभर १० टक्के खताचा कमी वापर करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतांची मात्रा वापरणे व त्यामध्ये १० टक्के खताचा कमी वापर करणे, अशी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने ‘कृषक कॅल्कुलेटर’ विकसित केले असून, वेगवेगळ्या प्रकारच्या खतांच्या माध्यमातून कशाप्रकारे खतमात्रा द्यावी हे या ॲपच्या माध्यमातून कळणार आहे. या ॲपचे प्रशिक्षण कृषी सहायकांमार्फत प्रत्येक शेतकऱ्याला दिले जाईल. याविषयी कृषी पर्यवेक्षक करणसिंग गिरासे यांनी मार्गदर्शन केले.
बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता, एक गाव, एक वाण याविषयी कृषी सहायक आण्णासाहेब ननावरे यांनी माहिती दिली. कृषी सहाय्यक उत्सव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी आर. डी. वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य शांताराम पाटील, विखरण-कानळदे कापूस उत्पादक शेतकरी गटाचे अध्यक्ष दीपक दशरथ पाटील, महाराणा प्रताप शेतकरी गटाचे अध्यक्ष गुलाबसिंग रजेसिंग गिरासे, सदाशिव पाटील, योगेश राजपूत, अरुण पाटील, राहुल पाटील, आदी उपस्थित होते.