लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात नंदुरबार जिल्ह्यात १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्यांनी कापणी झालेली पिके सांभाळावीत असा इशारा देण्यात आला आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा, जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र यांच्याकडून या इशार्याच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना सतर्क करण्यात आले आहे. काढणी केलेली खरीप पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. शेतात पाणी साचू न देता अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. पिकांना पाणी, खते देताना, कोळपणी तसेच इतर शेतात कामे करताना आणि कीटनाशक, तणनाशक फवारणी करताना पुढील हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा. फवारणी वारा शांत असताना करावी. फवारणी करताना स्टीकरचा वापर करावा. सर्व पिके वेळेवर आंतरमशागत करून तणविरहीत ठेवा. किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये वेळेवर पीक संरक्षण करावे असे कळवण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यातून शेतकर्यांना पुन्हा फटका बसू नये यासाठी कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाकडून शेतकर्यांना माहिती देण्यात येत आहे. यंदा कापूस लागवड काही अंशी लांबली असल्याने शेतशिवारात कापसाची बोंडे अद्याप फुटलेली नाहीत. पाऊस आल्यास ही बोंडे खराब होवून नुकसानीची भिती आहे.
दोन दिवस पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:26 IST