लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यात कोरोनासोबतच व्हायरल फिवर अन् डेंग्यूचाही धोका वाढला आहे. कोरोना काळात नवापूर शहरासह तालुक्यात डेंग्यूच्या अनेक रुग्णांची नोंद झाली. त्यांच्यावर नवापूर, सोनगड, व्यारा, बारडोली, सुरत येथे उपचार सुरू असले तरी प्रत्यक्षात रुग्णसंख्या यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. एका रुग्णाला बरे होण्यासाठी साधारण आठ ते दहा दिवस लागत असून उपचारासाठी १२ ते १५ हजार रुपये खर्च होत आहेत. नवापुरातील अस्वच्छतेने साथरोगांना असलेले निमंत्रण नागरिकांच्या जिवावर उठणार आहे. नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. नवापूर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असताना इतर आजाराचे रुग्ण कमी आढळून येत असल्याचा समज अनेकांमध्ये आहे. त्यामुळे बेफिकिरी वाढत असून नागरिक इतर आजारांकडे दुर्लक्ष करतात. मात्र हा प्रकार आरोग्यासाठी धोकेदायक असून इतर आजार डोके वर काढू लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्हायरल फिवरसोबतच डेंग्यूचाही धोका वाढला आहे. नवापूर शहरात पाच-सहा पॅथॉलॉजी लॅब आहेत. त्यांचाकडे दोन-तीन रुग्णांची नोंद दिसून येते. नवापुरात डेंग्यू कहर सुरू असल्याची आरोग्य विभागाला भनकदेखील नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा काही प्रमाणात कमी असला, तरी कोरोना काळात हा आजार धोकेदायक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी बेफिकिरी न करता वेळीच सावध होऊन प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनीही डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. मात्र अस्वच्छता, व नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ठिकठिकाणी साचलेल्या डबक्यांमध्ये आता डासांची उत्पत्ती होत आहे. केवळ डेंग्यूच नव्हे तर आता मलेरियाचाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात आता डेंग्यूच्या उद्रेकाची भीती निर्माण झाली आहे. यापासून पालिका प्रशासनाने काही धडा घेतलेला दिसत नाही. डेंग्यूच्या उद्रेकाला आता सुरुवात झालेली आहे. वेळीच संसर्ग नियंत्रणात न आल्यास पालिका प्रशासनाला सावरणे कठीण होणार आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये, डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी एक-दोनदाच शहरात फवारणी, धुरळणी करण्यात आली. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय मादी डासाचे चावण्यामुळे होतो. हा काळा डास असून याचे अंगावर पांढरे ठिपके असतात. हाच डास दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास त्यालादेखील डेंग्यू होण्याची भीती आहे. हा डास जास्त उंच उडत नाही. एकूण दोन प्रकार असले तरी डेंग्यू-२ हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यामध्ये शरीरातील पांढऱ्या पेशी (प्लेटलेट्स)ची संख्या झपाट्याने कमी होते. शरीराचा एखादा अवयवदेखील निकामी होतो. प्रसंगी मृत्यूदेखील ओढवतो. यातून रोगमुक्त होण्यासाठी दोन आठवड्यांपर्यंतही कालावधी लागू शकतो. लक्षणे कमी झाल्यानंतरही रुग्ण दीर्घकाळापर्यंत अशक्त राहतो.
- डेंग्यूची लक्षणे...
खूप ताप येणे हे डेंग्यूचे प्राथमिक लक्षण आहे. डोळ्यांच्या मागे जळजळ करणे, तापामध्ये अंगदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, मळमळणे, तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, काहीही खाण्याची इच्छा न होणे, पांढऱ्या पेशींची संख्या झपाट्याने कमी होणे, पोट फुगणे, तापासोबतच अंगावर लाल रंगाचे डाग पडणे, तोंडाची चव जाणे, चक्कर येणे, पचनक्रिया खराब होऊन उलट्या होणे, कधी उलट्यांमधून रक्तस्रावही होणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, श्वासाची गती कमी होणे, हिरड्यांमधून रक्तस्राव होणे, पोटात तीव्र स्वरूपाच्या वेदना आदी लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
नवापूर नगरपालिका संपूर्ण शहरावर लक्ष ठेवून आहे. प्रभागनिहाय पालिकेचा आरोग्य विभाग औषधांची फवारणी करीत आहे. स्वच्छता मोहीमही राबवली जात आहे. नागरिकांनी छतावर आजूबाजूच्या परिसरामध्ये पाण्याची डबकी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी जेणेकरून आपल्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. -हेमलता पाटील, नगराध्यक्षा, नवापूर
पाण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवा, घराचा परिसर स्वच्छ ठेवा, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा, स्वच्छतागृहांची नियमित सफाई करा, उकळलेले पाणी प्या, नियमित व्यायाम करा, कोरोना काळात कुठल्याही लक्षणांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये. डेंग्यू रुग्ण असलेल्या भागात सर्व्हे केला जाईल. -डॉ शशिकांत वसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी, नवापूर.
पालिका क्षेत्रात डबकी साचली आहेत. कचरा, नारळाच्या वाट्या, पडलेले टायर, प्लॅस्टिकचे डबे यामध्ये डेंग्यूच्या अळ्या तयार होतात. कुठल्याही प्रभागात नियमित फॉगिंग नाही. डबके-नाल्यांमध्ये एमएलओ ऑईल टाकले जात नाही. आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. -नरेंद्र नगराळे, विरोधी गटनेते, नगरपालिका, नवापूर