लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील कुढावद येथील २५ शेतकर्यांची फळ व्यापार्यांकडून गेल्या तीन वर्षांपासून फसवणूक होत आहे. शेतकर्यांनी दिलेल्या मालाचे पैसे संबधित व्यापारी परत करत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कुढावद येथील २५ पेक्षा अधिक शेतकर्यांनी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, सावद आणि रावेर येथील काही व्यापार्यांना २०१९ मध्ये फळ उत्पादन दिले होते. त्यानंतर या उत्पादनाचे पैसे संबधितांकडून येणे अपेक्षित होते. परंतु संबधित व्यापारी पैसे देण्याऐवजी व्यापार्यांची बोळवण करत असल्याचे प्रकार सुरू आहे. याच दरम्यान शेतकर्यांनी केळी, पपई, टरबूज, डांगर आदी उत्पादने राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील व्यापार्यांना विक्री केला होता. परंतु या व्यापार्यांनीही शेतकर्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकरी वारंवार तगादा लावूनही व्यापारी पैसे देत नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान माल खरेदी करताना हे व्यापारी त्यांची वाहने घेत सरळ शेत बांधावर येतात. शेतकर्याला भूलथापा देत मालाच्या रकमेचे अथवा कोरे धनादेश देणे तसेच आपल्या नावाच्या लेटर हेडवर लिहून देत पैसे बुडवणार नसल्याचे सांगतात. परंतु गावी परत गेल्यावर मात्र शेतकर्यांचे फोनच उचलत नसल्याचे प्रकार समोर होत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. नुकतेच विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नाशिक जिल्ह्यात शेतकर्यांच्या थकीत पैश्याच्या वसुलीसाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही मोहिम सुरू करण्याची अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने सहकार्य करावेनंदुरबार जिल्ह्यात शेतकर्यांच्या फसवणूकीचे प्रकार गेल्या काही वर्षात सातत्याने होत आहेत. या प्रकारांना आळा बसण्याची गरज आहे. शहादा तालुक्यातील कुढावद येथील ७५ लाख रूपयांची फसवणूक असताना दुसरीकडे तालुक्यातील इतर गावातील शेतकरीही व्यापार्यांकडून याच प्रकारे फसवले जात आहेत. त्यांच्या गावी जाणे किंवा कायदेशीर कारवाई शेतकर्यांना नुकसानदायक असल्याने पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. केळी आणि पपई उत्पादक शेतकर्यांचे सर्वाधिक पैसे अडकून पडले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
व्यापारी माल घेऊन गेल्यानंतर संपर्क करत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकरी यंदा अडचणीत आहेत. प्रशासनाने शेतकर्यांच्या समस्येचे निराकरण करुन थकीत रकमेची वसुली करून द्यावी.-भरत पाटील, शेतकरी, कुढावद ता. शहादा.