या बैठकीस मनपा आयुक्त सुनील लहाने, महिला व बालविकास अधिकारी रेखा पी. काळम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बालकल्याण समिती, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी तथा या समितीचे सदस्य उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
जिल्ह्यात आजवर कोरोनामुळे १ हजार ८६० व्यक्ती प्राणास मुकल्या असून, त्यांच्या कुटुंबांवर जी काही शोककळा पसरली आहे, त्याचा विसर संबंधित यंत्रणांनी कधी पडू न दिला पाहिजे. यात मुलांचा विषय हा भावनिक आणि मानसिक या दोन्ही दृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे. जिल्ह्यात अशी अनाथ मुले असतील तर त्यांच्यापर्यंत शासकीय योजना तत्काळ पोहोचाव्यात, यासाठी एका मिशन मोडवर सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून काम करणे अपेक्षित असल्याचे डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले.
शून्य ते सहा वर्षांच्या वयोगटातील बालकांचे पालक जर कोविडने आजारी असतील आशावेळी त्या बालकांची काळजी घेण्यास कुटुंबातील कोणी व्यक्ती नसेल तर अशा बालकांची व्यवस्था शिशूगृहात केली जाणार आहे. याबाबत शासनाने आदर्श कार्यपद्धती निर्गमित केली आहे.
शून्य ते सहा वयोगटातील मुलांसाठी लोहा येथील शिशुगृह, वय वर्षे ६ ते १८ गटातील मुलींसाठी सुमन बालगृह, नांदेड आणि लहुजी साळवे बालगृह, वाडीपाटी येथे मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्पलाईनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी १०९८, सेव द चिल्ड्रेन्स ७४०००१५५१८, ८३०८९९२२२२, अध्यक्ष बालकल्याण समिती ९८९०१०३९७२ आणि बालसंरक्षण अधिकारी ९७३०३३६४१८ या नंबरवर संपर्क साधावा.