लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्यातील बोरगाव येथे विहिरीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. आरती सुरेश शेवळे (१८) असे या तरुणीचे नाव असून, घराजवळच असलेल्या विहिरीतून पाणी काढत असताना तिचा तोल गेला असावा, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. गुरुवारी (दि.४) सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मृत आरती शेवळे ही बेला येथे नर्सिंग प्रशिक्षणासाठी ये-जा करीत होती. तिच्या आईच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया पार पडल्याने काैटुंबिक कामाची जबाबदारी तिच्यावर होती. दररोज पहाटे ५ वाजताच्या सुमारास विहिरीतून पाणी आणण्यासाठी ती जात असे. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वडील सुरेश शेवळे यांना ती दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली असता, आरतीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच उमरेड पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. उमरेड पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली असून, पाेलीस निरीक्षक यशवंत साेलसे पुढील तपास करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर आरतीच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल.