महिलेचा विनयभंग : सक्करदऱ्यातील घटना नागपूर : आईला जादूटोणा केल्याच्या संशयाने पछाडलेल्या एका तरुणाने शेजारच्या दाम्पत्याला बेदम मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. शनिवारी दुपारी सक्करदऱ्यात ही संतापजनक घटना घडली. दीपक राजेश सेलोटे (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. तो सक्करदऱ्यात राहतो.दीपकची आई अनेक दिवसांपासून आजारी आहे. तिला शेजारच्या महिलेने (वय ४५) जादूटोणा केल्याचा दीपकला संशय आहे. त्यामुळे तो त्या महिलेसोबत नेहमी कुरबूर करायचा. शनिवारी दुपारी २ वाजता तो पीडित महिलेच्या घरी गेला. तिच्यावर जादूटोण्याचा आरोप लावून तिला नको तशी शिवीगाळ केली. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला बेदम मारहाण केली. आरोपी तिच्यासोबत अपमानास्पद वर्तन करीत असल्याचमुळे तिचा पती मदतीला धावला असता आरोपीने त्यालाही मारले. यामुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक बी.आर. फुलझेले यांनी दीपकविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.(प्रतिनिधी)
जादूटोण्याच्या संशयावरून दाम्पत्याला मारहाण
By admin | Updated: November 7, 2016 02:30 IST