लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अपघाताचे ब्लॅक स्पॉट हुकडून काढण्यासोबतच वाढत्या रस्ता अपघातावर सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुचविण्यासाठी व्हीएनआयटीसोबत काम केले जाणार आहे. त्यासाठी संबंधित संस्थेला प्रस्ताव मागविण्यात आला असल्याची माहिती खा. डॉ. विकास महात्मे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत १४ फेब्रुवारीला कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) बजरंग खरमाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विनोद जाधव उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना महात्मे म्हणाले, रस्ता अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षेसाठी एनजीओंची मदत राज्यातील अनेक ठिकाणी घेतली जात आहे. नागपूर ग्रामीणमध्ये जे.पी. रिसर्च या संस्थेच्या सहकार्यातून काम सुरू आहे. वेगावर मर्यादा आणण्यासाठी नव्या तंत्राचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे. दंडात्मक उपाययोजनांबद्दल चर्चा केली जाणार आहे.
रस्ता अपघात शून्यावर आणता यावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अंतर्गत उपाययोजना आखल्या जात आहेत. नागरिकांनी आणि युवकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे.
जिल्हाधिकारी ठाकरे म्हणाले, १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या काळात हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. युवकांमध्ये जनजागृती घडण्यासाठी मकरंद अनासपुरे यांना विशेष निमंत्रित केले आहे. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाला गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पालकमंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
वंजारी उड्डाण पुलावर २६ जानेवारीला युवकांनी केलेल्या स्टंटप्रकरणी वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. संबंधित युवकांचे परवाने निलंबित केले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विनोद जाधव यानी दिली. परवाने देताना प्रतिज्ञा वदवून घेणे, उपरोधात्मक प्रबोधन करणे, एफएम रेडिओवरून प्रश्नमंजुषा सारखे उपक्रम सुरू असल्याचे सांगण्यात आले.