अविश्वास प्रस्ताव पारित : प्रशासक नियुक्त होणारवाडी : स्थानिक ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात मंगळवारी १७ विरुद्ध १३ मतांनी अविश्वास ठराव मंजूर केला. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच बेबी ढबाले व उपसरपंच श्याम मंडपे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.वाडी ग्रामपंचायत जिल्ह्यात महत्त्वपूर्ण समजली जाते. जवळपास सात ते आठ कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न देणारी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक आहे. आर्थिक घडामोडीमुळे प्रत्येक वर्षी सरपंच व उपसरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची परंपरा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी अस्तित्वात आणली. त्याचाच भाग म्हणून सरपंच व उपसरपंच यांना पायउतार व्हावे लागले. गावातील विकास कामात अडथळा निर्माण करणे, मनमर्जीने ठराव घेताना सदस्यांना विश्वासात न घेणे या कारणांमुळे सरपंच व उपसरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रा. मधु माणके यांनी सांगितले. आॅगस्ट २०१० ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत भाजपचे नरेश चरडे सरपंच व राष्ट्रवादीचे श्याम मंडपे उपसरपंचपदी विराजमान झाले. २९ मार्च २०१२ ला नरेश चरडे हटाव मोहीम हाती घेऊन २१ जुलै २०१२ ला सरपंचाविरोधात अविश्वास प्रस्ताव १२ विरुद्ध ५ मतांनी फेटाळला होता. त्यानंतर १२ जून २०१३ ला उपसरपंच श्याम मंडपे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादी व बीएसपीच्या एकीकरणाच्या बळामुळे महायुतीचा बार फुसका ठरला. काँग्रेसचे सरपंच व राष्ट्रवादीचा उपसरपंच असूनही काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य राजेश थोराणे, दुर्योधन ढोणे, सीमा कनोजे यांनी काँग्रेसविरुद्ध बंड पुकारून वाडीच्या पहिल्या महिला सरपंचाला खाली आणले. केवळ बीएसपीचे अमित तायडे व शिवसेनेचे दिलीप चौधरी हे दोन सदस्य सरपंच व उपसरपंचाच्या बाजूने होते. वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यामुळे यानंतर सरपंचपदाची निवडणूक होणार नसून वाडी ग्रामपंचायतचे काम प्रशासक पाहणार असल्याचे स्पष्ट आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून महिनाभरात नगर परिषद स्थापन होऊन विधानसभेच्या निवडणुकासह वाडी नगर परिषदेची निवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत.१७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी १२ सदस्यांची आवश्यकता होती. तहसीलदार शोभराज मोटघरे, मंडळ अधिकारी आर.एच. बमनोटे, तलाठी एस.एन. झाडे, वरिष्ठ लिपिक ईश्वर बुधे, राजेंद्र उसाळे यांच्या उपस्थितीत माजी सरपंच नरेश चरडे, प्रा. मधु माणके, दुर्योधन ढोणे, राजेश थोराणे, सीमा कनोजे, दिनेश कोचे, दिनेश फुलसंगे, विश्वनाथ कुकसे, राजेश जिरापुरे, सुजाता वानखडे, गीता उके, चंद्रप्रभा खोब्रागडे, सुनीता भोंगळे या १३ ग्रामपंचायत सदस्यांनी हात उंचावून अविश्वास प्रस्ताव पारित केला. यावेळी सरपंच, उपसरपंच व अमित तायडे, दिलीप चौधरी उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)
वाडीचे सरपंच, उपसरपंच पायउतार
By admin | Updated: July 16, 2014 01:18 IST