वसीम कुरैशी
नागपूर : कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील हजारो बालके आपल्या नियमित लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. हा ‘बॅकलॉग’ संपविण्यासाठी ८ फेब्रुवारीपासून इंद्रधनुष मोहीम चालविली जाणार आहे. महानगरपालिकेच्या २८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १० ‘हेल्थ पोस्ट’मध्ये लस दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारपासून शाळा सुरू होत आहेत. आरोग्य कर्मचारी शाळेत जाऊन संबंधित वयोगटातील विद्यार्थ्यांना लस देणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला दूर ठेवण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे महत्त्वाचे होते. यातच मनपाचे बहुसंख्य कर्मचारी कोविड महामारीशी जुळलेल्या कामात व्यस्त होते. परिणामी, मार्च ते ऑगस्ट २०२० या लॉकडाऊनच्या काळात लसीकरण प्रभावित झाले होते. परंतु ‘अनलॉक’नंतर लसीकरणाला सुरुवात झाली. या अडीच महिन्यात ६,५६० बालकांचे लसीकरण करण्यात आले.‘ओपीव्ही-३’चे १५,२१९ लाभार्थ्यांना डोज देण्यात आले. एमआरचा पहिला डोज (एक वर्षे वयोगटातील) १९,०१४ तर ‘ओपीवी’, ‘डीपीटी’चा बूस्टर डोज १७,०९६ बालकांना देण्यात आला. ‘पेंटा व्हॅक्सिन-३’ (साडेचार वयोगटातील) १५,१६६ लाभार्थ्यांना देण्यात आला. याशिवाय, ‘टीटी-१०’ लसीकरणासाठी ३७,९२८ चे लक्ष्य ठेवण्यात आले होते. परंतु केवळ ८,९३८ बालकांनाच लस देऊ शकले. ‘टीटी-१६’साठी २३,८७२ चे लक्ष्य होते. परंतु ६,५३९ लाभार्थ्यांनाच लस देण्यात आली. सर्वच वयोगटातील जवळपास २० टक्के बालके लसीकरणापासून वंचित आहेत.
-लसीकरणाचा बॅकलॉग भरून काढणार
लसीकरणाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी ८ फेब्रुवारीपासून ‘मिशन इंद्रधनुष’ हाती घेतले जाणार आहे. कोरोनामुळे लक्ष्याच्या १० टक्के लसीकरण प्रलंबित आहे. या लसीकरणासाठी आरोग्य केंद्रांवर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. आरोग्य कर्मचारी शाळेत जाऊनही लस देतील.
- डॉ. संजय चिलकर,
मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी