नागपूर : बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली-सैलानी येथे शिबिरे चालवून दहशतवादी कारवाया केल्या प्रकरणी अकोला एटीएसचे पोलीस निरीक्षक केशव श्यामराव पातोंड यांच्या फिर्यादीवरून २७ मार्च २०१२ रोजी अकिल युसुफ खिलजी (४५), जफर हुसैन कुरेशी (३२), मोहम्मद अबरार खान ऊर्फ मुन्ना, अन्वर इब्राहम हुसैन खत्री, शाकीर ऊर्फ खलील खिलजी आणि डॉ. अबू फैजल यांच्याविरुद्ध भादंविच्या १५३ अ, १२० ब, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या ३ (१०), (१३), (१५), (१६) कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपींपैकी अबरार हा इंदूर तर बाकीचे खांडवा येथील रहिवासी आहेत. हे दहशतवादी सैलानी गावात मुक्कामास असल्याच्या गुप्त माहितीवरून एटीएसचे पोलीस अधीक्षक नवीन रेड्डी यांच्या नेतृत्वातील पथकाने छापेमार कारवाई केली होती. मोहम्मद अबरार हा आपल्या एका साथीदारासह औरंगाबाद येथे जाणार असल्याचे समजल्यावरून पथकाने त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी बुलडाणा भागात त्यांचा शोध घेतला होता. दरम्यान २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबाद येथे खलील खिलजी याने पोलीस पथकावर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरात पोलीस पथकानेही दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. परिणामी खलील जखमी झाला होता. आणखी एक दहशतवादी अजहर कुरेशी ऊर्फ वकील कुरेशी हा पोलीस चकमकीत ठार झाला होता. एटीएसने मोहम्मद अबरार, अन्वर हुसैन आणि खलील खिलजी यांना अटक केली होती. त्यानंतर सैलानी आणि चिखली येथे सापळा रचून अकिल खिलजी आणि जफर कुरेशी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मुस्लीम तरुणांना चिथावणारे आक्षेपार्ह साहित्य, रिव्हाल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. अबू फैजल, मोहम्मद सलीक आणि अब्दुल हकीम यांना अद्याप एटीएसने अटक केली नव्हती. सध्या अकिल खिलजी, जफर कुरेशी आणि अबू फैजल हे भोपाळच्या कारागृहात आहेत. खलील खिलजी हा नाशिक रोड कारागृहात, अबरार हा अहमदाबाद साबरमतीच्या कारागृहात आहे. अन्वर हा औरंगाबादच्या कारागृहात आहे. तर दोघे अद्याप फरार आहेत. (प्रतिनिधी)
शिबिरे चालवून दहशतवादी कारवाया
By admin | Updated: July 11, 2014 01:15 IST