नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बडेगाव येथे अवैध उत्खननाला मंजुरी दिल्याप्रकरणी संबंधित एसडीओ व तहसीलदार यांना निलंबित करून या प्रकरणाची आठ दिवसांत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. अवैध वाळू उत्खननप्रकरणी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. चौकशीत अधिकारी निर्दोष आढळून आल्यास त्यांना परत कामावर घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बडेगाव येथील अवैध उत्खनन प्रकरणी ‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करून हे प्रकरण उघडकीस आणले होते, हे विशेष. गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सुभाष साबने यांनी वाळू उत्खननाचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर भाजपचे सदस्य सुधाकर देशमुख यांनी उपप्रश्न उपस्थित केला. त्यांनी विधानसभेत लोकमतमधील वृत्ताचा उल्लेख करीत बडेगाव येथे एसडीओ व तहसीलदारांनी अवैध उत्खननाला मंजुरी दिल्याची बाब लक्षात आणून दिली. तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. देशमुख यांच्या माहितीनुसार महसूल मंत्र्यांनी उपरोक्त घोषणा केली. तसेच वाळू वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला देण्यात येणाऱ्या गौन खनिजाच्या रॉयल्टीचा मोठा भाग संबंधित गावाच्या विकासावर खर्च करण्यात यावा, यासंबंधानेसुद्धा सुधारित आदेश जारी करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.भास्कर जाधव, योगेश सागर, यशोमती ठाकूर यांनीसुद्धा यावेळी उपप्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन खडसे यांनी दिले. (प्रतिनिधी)
तहसीलदार एसडीओ निलंबित होणार
By admin | Updated: December 19, 2014 00:52 IST