स्थानिक स्वराज्य संस्था : रोहयो मंत्र्यांचे मतनागपूर : काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीने भाजप-सेनेशी हातमिळवणी केली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत एकत्र लढायचे असेल तर राष्ट्रवादीने ही युती तोडावी तरच त्यांच्याशी बोलणी केली जाईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा)नवीन आयुक्तालयाच्या उद््घाटनानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते.विधानसभा निवडणुकांच्या तयारीला दोन्ही पक्षांकडून सुरुवात झाली असून लवकरच जागा वाटपाबाबत बोलणी होणार आहे. मात्र जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी केलेली भाजप-सेनेशी युती तोडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी बोलणी करू नये, असे राऊत म्हणाले. ही बाब आपण दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीच्या बैठकीत मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत मुख्यमंत्री हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग मंत्री नारायण राणे नाराज नाहीत त्यांची समजूत काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याने नितीन राऊत यांनीही त्यांचा राजीनामा दिला होता, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता राऊत म्हणाले,या राजीनाम्याची कारणे वेगळी होती. राणेंच्या नाराजीची कारणे वेगळी आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान केंद्र सरकारकडून मनरेगा योजनेत बदल करण्याबाबत अद्याप काहीही संकेत मिळाले नाही. मात्र या योजनेचे खुद्द अडवाणी यांनी यापूर्वी कौतुक केले आहे, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.
भाजप-सेनेशी युती तोडली तरच राष्ट्रवादीशी बोलणी
By admin | Updated: July 18, 2014 00:59 IST