काटोल : शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काटोल पोलीस हद्दीतील वाघोडा शिवारात गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सततच्या नापिकीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.कुशाल पुरुषोत्तम हिवसे (३०, रा. सबकुंड, ता. काटोल) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वाघोडा शिवारात भोंडवे यांची शेती आहे. भोंडवे हे गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेतात गेले असता, शेतातील विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी लगेच काटोल पोलिसांना सूचना दिली. कुशालकडे साडेपाच एकर शेती असून, त्याने स्थानिक नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीककर्ज घेतले होते. सततच्या नापिकीमुळे त्याला या कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. त्यातच या बँके ने पीककर्ज देणे बंद केले. त्यामुळे शेतीचा खर्च भागविण्यासाठी त्याने सावकाराकडून कर्ज घेतले होते. पीककर्ज थकीत असल्याने जिल्हा बँकेने त्याला नो ड्यू सर्टिफिकेट दिले नाही. त्यामुळे त्याला अन्य राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जपुरवठा करण्यास नकार दिला. यावर्षी त्याने कशीबशी तडजोड करून पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने पीक हातचे जाणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली. सर्व मार्ग बंद झाल्याने तो काही दिवसांपासून चिंतामग्न होता. त्यातच सोमवारपासून बेपत्ता असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या प्रकरणी काटोल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By admin | Updated: July 17, 2015 03:21 IST