कॅम्पसमध्ये सुरू केले माहिती केंद्र : प्रशासनाच्या अनास्थेला सकारात्मक पावलाने सडेतोड उत्तरनागपूर : विकासाचे मोठमोठे दावे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अजूनपर्यंत विद्यार्थ्यांसाठी माहिती केंद्र सुरू करणे जमलेले नाही. विद्यापीठाचा पसारा मोठा असल्याने विद्यार्थ्यांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जो फटका आपल्याला बसला तो नवीन विद्यार्थ्यांना बसू नये, या भावनेतून काही माजी विद्यार्थी एकत्र आले व त्यांनी विद्यापीठाच्या महात्मा फुले शैक्षणिक परिसरात म्हणजेच ‘कॅम्पस’मध्ये माहिती व समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करण्याचा या माजी विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे, हे विशेष. जी बाब इतक्या वर्षांत विद्यापीठ प्रशासनाला जमली नाही, ती प्रत्यक्षात आणणाऱ्या या विद्यार्थ्यांपासून आता तरी अधिकारी काही शिकवण घेणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ‘कॅम्पस’मधील निरनिराळ्या पदव्युत्तर विभागांत प्रवेशाचे दिवस असल्याने सध्या विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे. परंतु या परिसरात एकही विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काही माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने हे माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. विभागांमधील प्रवेश, वसतिगृह, शुल्क आकारणी, वाहतुकीची साधने आदीसंदर्भात विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. गेल्या दोन आठवड्यांत या माहिती केंद्राचा हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.(प्रतिनिधी)प्रशासनाची अनास्थाप्रवेशाच्या काळात विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता, संघटनेतर्फे विद्यापीठ प्रशासनाला माहिती केंद्र सुरू करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. परंतु प्रशासनाने ती धुडकावून लावली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:च पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या अनास्थेला विद्यार्थ्यांनी सकारात्मक पाऊल उचलून सडेतोड उत्तर दिले आहे.
जे विद्यापीठाला जमले नाही ते विद्यार्थ्यांनी केले
By admin | Updated: July 11, 2014 01:26 IST