मागच्या वर्षीची परिस्थिती निर्माण होऊ न देण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसात नागपूरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोणत्याही परिस्थितीत मागच्या वर्षीची परिस्थिती निर्माण होता कामा नये, त्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
नितीन राऊत यांनी शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीची आढावा बैठक बोलावून रुग्ण संख्या का वाढत आहे? या संदर्भातील माहिती घेतली. नागरिकांनादेखील त्यांनी या बैठकीतून आवाहन केले
आहे?
की, कोरोना आजार अद्याप हद्दपार झालेला नसून, नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे व सुरक्षित अंतर राखून दैनंदिन व्यवहार करणे, आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आजच्या वरिष्ठस्तरीय बैठकीमध्ये विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.आर.पी.सिंग, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी.एस.सेलोकर, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने आदी उपस्थित होते.
बैठकीत वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व टास्क फोर्सच्या अन्य सदस्यांनादेखील रुग्णसंख्या वाढीसंदर्भात यावेळी विचारणा करण्यात आली. वातावरणातील बदलामुळे आजारांमध्ये वाढ झाल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचेही पुढे आले; मात्र त्यासोबतच नागरिकांनी गेल्या काही दिवसात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांकडे दुर्लक्ष केले असल्याचे निरीक्षण अनेकांनी मांडले. वैद्यकीय क्षेत्राने याबाबत चिंता व्यक्त केली. यावर पालकमंत्र्यांनी कोरोना नियंत्रणासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले, तसेच उपाययोजनांही सुचवल्या.
अशा आहेत सूचना
चाचणीची संख्या वाढविण्यात यावी
धार्मिक स्थळे व अन्य माध्यमातून नागरिकांना मास्क वापरणे व कोरोना संदर्भातील अन्य नियमांचे पालन करण्याचे निर्देश देणे
स्वयंसेवी संस्थांनी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सहभागी व्हावे,मास्क न वापरणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मास्क वाटप करण्यात यावे,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या विभागात, गावात, शहरात, वार्डात जनजागृती करावी.
उत्तम काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जिल्हा परिषद व महानगरपालिकेमार्फत सत्कार व्हावा,
कॉल सेंटर पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे,
प्रसिद्धी मोहिमेला गती देण्यात यावी,
लग्न समारंभातील वाढत्या उपस्थितीवर निर्बंध घालण्यात यावे,
बाजार, शाळा-महाविद्यालयांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे कडक पालन,
शहरांमध्ये मास्क न वापरण्याच्या संदर्भात कारवाई करण्यात यावी,
ग्रामीण भागात पोलिसांनी कारवाई सुरू करावी