लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : कांद्री (ता. पारशिवनी) येथील वेकाेलिच्या जवाहरलाल नेहरू हाॅस्पिटलमधील काेविड सेंटरमध्ये याेग्य उपचाराअभावी साेमवारी (दि. १२) चाैघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. याबाबत मृतांच्या कुटुंबीयांनी कन्हान पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली आहे. शिवाय, खा. कृपाल तुमाने आणि आ. आशिष जयस्वाल यांनी शुक्रवारी (दि. १६) कामठी काॅलरी येथील वेकाेलिच्या विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीत या प्रकरणाची चाैकशी करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले असून, यातील दाेषींवर कठाेर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला खा. कृपाल तुमाने व आ. आशिष जयस्वाल यांनी या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर भविष्यात अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती हाेऊ नये म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत समितीमार्फत या घटनेची चाैकशी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले. कांद्री येथील वेकाेलिच्या जवाहरलाल नेहरू हाॅस्पिटलमध्ये प्रशासनाच्या मंजुरीने काेविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. काेराेना रुग्णांवर याेग्य उपचार करता यावे म्हणून येथे ४८ खाटांची व्यवस्था करण्यात आली. या हाॅस्पिटलमध्ये जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांद्वारे प्रशिक्षित डाॅक्टर्स व वेकाेलि इतर आराेग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे तसेच ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही खा. कृपाल तुमाने यांनी दिले.
या बैठकीला वेकोलिचे निदेशक (कार्मिक) डॉ. संजय कुमार, नागपूर क्षेत्रीय महाप्रबंधक आभाषचंद्र सिंग, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सेलाेकर, उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे, नायब तहसीलदार आडे, कन्हानचे प्रभारी ठाणेदार क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवर, वेकोलि तांत्रिक सहायक (कार्मिक) व्ही. के. सिंग, कार्मिक प्रबंधक ए. के. सिंग, नागपूर क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक ए. के. सिन्हा, उपक्षेत्रीय प्रबंधक सुरेश तलंकर, मनोज त्रिपाठी, इलियास अहमद, साबिर सिद्दीकी, श्यामू कैथल आदी उपस्थित हाेते.
...
रिपाेर्ट मिळण्यास विलंब
काेराेना टेस्ट रिपाेर्ट मिळण्यास विलंब हाेत असल्याचा मुद्दा काेळसा श्रमिक सभेचे अध्यक्ष शिवकुमार यादव यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे काेराेना संक्रमण वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे मूकबधिर विद्यालयात काेविड केअर सेंटर सुरू करण्याची तसेच ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली, त्यांना जवाहरलाल नेहरू हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची सूचनाही शिवकुमार यादव यांनी केली. काेराेना चाचणी केंद्रांवर नागरिकांची गैरसाेय हाेत असून, त्यांना उन्हात तास न् तास उभे राहावे लागते. त्यामुळे केंद्रांवर सुविधा व सावलीची व्यवस्था करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांनी केली. या समस्या साेडविण्यात येणार असल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
...