नागपूर : तातडीने आवश्यक उपाययोजना करून प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर व विक्री थांबवा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकार व महानगरपालिकेला दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नायलॉन मांजामुळे घडलेल्या प्राणघातक घटना आणि गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, उच्च न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. प्रणय ठाकरे (२१) या तरुणाचा इमामवाडा परिसरात नायलॉन मांजाने गळा कापून वेदनादायी मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच मानेवाडा येथे सौरभ पाटणकर (२२) हा तरुण नायलॉन मांजाने गळा कापण्यापासून थोडक्यात बचावला. डिसेंबरमध्ये झिंगाबाई टाकळी येथे एका तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरला गेला. यावर्षी अशा अनेक घटना घडल्या. याशिवाय नायलॉन मांजा पशुपक्ष्यांसाठीही घातक ठरत आहे. नायलॉन मांजामुळे असंख्य पक्षी मृत्यूमुखी पडले व गंभीर जखमी झाले आहेत. राज्यात नायलॉन मांजा खरेदी-विक्री व वापरावर बंदी आहे. परंतु, काही व्यापारी पैशाच्या लालसेपोटी लपूनछपून नायलॉन मांजाची विक्री करतात.