मनपा कंत्राटदारांची महापौरांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील कामे कोरोनामुळे आधीच ठप्प होती. अनलॉक कालावधीत काही कामे सुरू झाली. पण, वेळेवर बिल मिळत नाही. त्यात बिलात त्रुटी काढल्या जातात. विशेष म्हणजे बिल तीन टेबलच्या प्रवासानंतर वित्त विभागात पोहाेचते. बिलाच्या लांबच्या प्रवासामुळे कंत्राटदार त्रस्त आहेत. बिलाचा हा टेबलप्रवास थांबविण्यात यावा, अशी मागणी मनपा कंत्राटदार संघटनेने महापौर दयाशंकर तिवारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मनपाच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चासाठी आर्थिक तरतूद केली जाते. मुख्य अभियंत्यांनी काढलेल्या आदेशानुसार बिल थेट वित्त व लेखा विभागात जाणे अपेक्षित आहे. परंतु, अधिक रकमेच्या बिलाची फाइल मोठे अधिकारी आपल्याकडे बोलवतात. यात काही सहायक आयुक्तांचाही समावेश आहे. वास्तविक, प्राकलन तयार करताना त्यात त्रुटी असतात. निविदा काढण्यापूर्वी त्यात दुरुस्ती अपेक्षित असते. परंतु, असे होत नाही. सुरक्षा ठेव परत मिळणे कठीण झाले आाहे. अनेकदा कामाची फाइल मिळत नाही. फाइल मिळाली तर संबंधित अधिकाऱ्यांची बदली झालेली असते. हा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी म्युनिसिपल काॅर्पोरेशन कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापौरांकडे केली. यात रमेश शर्मा, वि.ए. भडांगे, प्रशांत ठाकरे, के.व्ही. नायडू, उमेश ओझा, हरीश केवलरामानी, आर.एम. गोपलानी, जितू गोपलानी, राजू वंजारी, नरेंद्र हटवार, विनोद मडावी, अतुल रामटेके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी होेते.