रस्त्यांवर अंधार: मनसेची कंत्राट रद्द करण्याची मागणीनागपूर : ऊर्जा बचत व्हावी यासाठी शहरातील रस्त्यांवर एलईडी लाईट लावण्याचा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाची प्रशंसाही झाली. परंतु कंत्राटदाराला शहरात १८ महिन्यांत २६ हजार ७१२ खांबांवर एलईडी दिवे लावायचे असताना गेल्या १३ महिन्यांत केवळ २७० एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. मागील चार महिन्यांपासून मनसेचे पदाधिकारी तज्ज्ञांना सोबत घेऊ न शहरातील मार्गावर बसविण्यात आलेल्या एलईडी दिव्यांचा सर्वे करीत आहे. यात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मनपातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांतील मधूर संबंधामुळे शहरातील एलईडी दिव्यांचा उपक्रम अपयशी ठरल्याचा आरोप मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे.२५० वॅट सोडियम वेपर दिव्यांच्या जागी १५० वॅट क्षमतेचे एलईडी लावण्यात आल्याने रात्रीला पुरेसा प्रकाश पडत नाही. मनपाने जे.के. सोल्युशन यांच्याशी शहरात एलईडी दिवे लावण्याचा १८ मे २०१४ रोजी करार करून कंत्राट देण्यात आले. कंत्राटदाराला १८ महिन्यांत हे काम पूर्ण करावयाचे आहे. परंतु करारानुसार काम होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मनपा प्रशासनाने यासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा मनसेने दिला आहे.यासाठी तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. परंतु जे.के. सोल्युशन कंपनीला काम देण्यात आले. एलईडी दिव्याचे आयुष्य ११ वर्षे असते. परंतु करार १६ वर्षांचा करण्यात आला. शहरातील ५० टक्के दिवे मंद ठेवण्याचा अधिकार कंपनीला देण्यात आला आहे. करारात अनेक त्रुटी असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांना निलंबित करा मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात कराराचा मसुदा तयार करण्यात आला होता. यातील त्रुटीसंदर्भात विचारणा करता जयस्वाल योग्य उत्तर देत नाही. त्यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
२६ हजारापैकी लागले फक्त २७० एलईडी
By admin | Updated: July 16, 2015 03:19 IST