नागपूर : कोरोना नियमांतर्गत सुरू असलेली दुकाने आणि उद्योगांप्रमाणचे इंजिनिअरिंग वर्कशॉप व सर्व्हिस स्टेशनचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करून सुरू करण्याची मागणी विदर्भ ऑटोमोबाइल्स डीलर असोसिएशनने (व्हीएडीए) शासानाकडे केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वजण जागरूक झाले आहेत. व्हीएडीएचे सर्व सदस्य राज्य शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन करीत आहे. इंजिनिअरिंग वर्कशॉप आणि सर्व्हिस स्टेशन फॅक्टरी अॅक्टअंतर्गत येतात. एसएसआयसह एमएसएमई दिशानिर्देश आणि उद्योग प्रमाणपत्रांतर्गत नोंदणीकृत आहेत. लॉकडाऊनमध्ये उद्योग आपत्ती व्यवस्थापनांतर्गत काम करीत आहेत. त्याचप्रमाणे वर्कशॉपचे संचालन करता येऊ शकते. सध्याच्या काळात आपत्ती व्यवस्थापन सेवांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामध्ये हेल्थ वर्कर, पोलीस, आवश्यक सेवांकरिता वाहतुकीची वाहने, दैनिक गरजांमध्ये भाजी, फळ, औषधांच्या वाहतुकीची वाहने, अॅम्ब्युलन्सचा समावेश आहे. याशिवाय आपत्कालीन सेवांमध्ये सार्वजनिक वाहन, रुग्णालय व फार्मसी, स्मशान वाहनांसह अन्य कॉलच्या आधारे तत्काळ सेवा देत आहेत. या वाहनांच्या दुरुस्ती व देखभालसाठी वर्कशॉप व सर्व्हिस सेंटर सुरू करण्याची गरज आहे. वाहनांची दुरुस्ती न झाल्यास समस्या येतील.