लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या ही काळजी वाढविणारी आहे. कोविड नियंत्रणासाठी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) तात्काळ खुले करून तेथे कोरोना उपचार केंद्र स्थापन करावेत, अशी मागणी खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. यासोबतच कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाने सर्वांच्या सहकार्याने कार्य करावे अशा सूचना केल्या आहेत.
खा. कृपाल तुमाने म्हणाले, सालई-गोधनी नागपूर ग्रामीण, भूगाव (ता. कामठी), भिष्णूर (ता. नरखेड) व धानला (ता. मौदा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी) च्या सर्व सुविधा युक्त व सुसज्य इमारती तयार आहेत. येथे भरपूर जागा व उपचाराची सोय आहे. केवळ या इमारतींचे उद्घाटन झाले नसल्याने उपरोक्त चार पीएचसी कार्यरत नाहीत. यामुळे सुविधा असूनही त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नाही. या पीएचसी तातडीने सुरु करणे काळाची गरज आहे. यासाठी उद्घाटनाचा मुहूर्त पाहू नये.