नागपूर : सीबीएसई शाळा प्रशासनाकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पिळवणूक त्वरित थांबवून त्यांना नियमानुसार योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सिस्वा संघटनेने पाठपुरावा केला. त्यानुसार सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश पीएमओ ऑफिस व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले. मिळालेल्या निर्देशानुसार सीबीएसईने महाराष्ट्र सरकारला अधिकार प्राप्त करून दिला. सीबीएसईच्या या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी सीबीएसई स्कूल स्टाफ वेल्फेअर असोसिएशन (सिस्वा)च्या अध्यक्ष दीपाली डबली यांनी शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांची भेट घेतली. त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अपर मुख्य शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांना निवेदन पाठविले. यावेळी शिक्षक आमदार नागो गाणार, सिस्वाचे सल्लागार अॅड संजय काशीकर, प्रमोद रेवतकर, सचिव आचल देवगडे, कोषाध्यक्ष महेश डबली तसेच भंडारा व नागपूर येथील सिस्वाचे सदस्य उपस्थित होते. सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापन करण्याचे अधिकार महाराष्ट्र शासनाला मिळाल्यामुळे नागपूर शिक्षण विभागातर्फे सीबीएसई प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांनी दिले. भंडारा येथील शैक्षणिक संस्था शिक्षकांना नाहक त्रास देत असल्याबाबतही सिस्वाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. त्यावर लवकरच शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांनी दिले.
............