नागपूर : जबाबदारीचे काम सोडून केस विंचरायला जाणे आणि हटकणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ व मारहाण करणे हे गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी दिला. तसेच, दोषी कामगार रंगराव चौधरी यांच्या बडतर्फीचा आदेश कायम ठेवला.
चौधरी वानाडोंगरी येथील महर्षी बाबासाहेब केदार सहकारी सूतगिरणीत वाईंडर म्हणून काम करीत होते. २४ एप्रिल १९९५ रोजी ते मशीन एकटी सोडून केस विंचरायला गेले. दरम्यान, स्पिनिंग मास्टर आर. के. जवादे राऊंडवर आले असता, त्यांना चौधरी मशीनजवळ दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी चौधरी यांना तत्काळ मशीनजवळ जाऊन कामाला सुरुवात करण्यास सांगितले. परिणामी, चौधरी यांनी चिडून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. चौकशीत गुन्हा सिद्ध झाल्यामुळे १२ जून १९९७ रोजी त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर आधी कामगार न्यायालयाने १२ डिसेंबर २००५ रोजी तर, पुढे औद्याेगिक न्यायालयाने १९ जुलै २०१४ रोजीच्या निर्णयाद्वारे बडतर्फीचा आदेश कायम ठेवला. त्याविरुद्ध चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिकाही खारीज करण्यात आली.