कळमेश्वर : २०२० ते २०२५ या कालावधीकरिता कळमेश्वर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तहसील कार्यालय येथील सभागृहात आरक्षण जाहीर करण्यात आले. याप्रसंगी निघालेल्या आरक्षणाने अनेक इच्छुकांच्या सरपंच होण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. ५० पैकी २५ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव असून, यात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १२, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ७, अनुसूचित जाती महिलांसाठी ४ तर अनुसूचित जमाती महिलांसाठी २ जागांचा समावेश आहे. आरक्षण सोडत जाहीर कार्यक्रमात तहसीलदार सचिन यादव, नायब तहसीलदार प्रशांत गड्डम, सभापती श्रावण भिंगारे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र डोंगरे, पंचायत समिती सदस्य विजय भांगे, लिपिक बिलाल खान तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गुरुवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार सर्वसाधारण महिलांसाठी - सोनोली, लोहगड, चाकडोह, तिष्टी (बु.), सावळी (खुर्द), गोंडखैरी, आष्टीकला, दहेगाव, साहुली, निळगाव, सोनेगाव, पानउबाळी. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी - तेलकामठी, सुसुंद्री, म्हसेपठार, बुधला, धापेवाडा (बु.), सेलू, खैरी (लखमा), अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी खुमारी, आदासा, वरोडा, उपरवाही. सर्वसाधारण प्रवर्गासाठी - मांडवी, पिल्कापार, तिडंगी, नांदीखेडा, कोहळी, कन्याडोल, सावळी (बु.), झुनकी, मढासावंगी, लोणारा, तोंडाखैरी, कळंबी. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी - पारडी (देशमुख), मोहगाव, बोरगाव (बु.), बोरगाव (खुर्द), वाढोणा (बु.), पिपळा (किनखेडे). अनुसूचित जाती प्रवर्गासाठी - तेलगाव, खापरी (कोठे), निमजी, लिंगा. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी - भडांगी, उबाळी, परसोडी, अनुसूचित जमाती महिला प्रवगार्साठी सावंगी (तोमर), घोराड या गावाचा समावेश आहे.
राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात
सरपंचपदासाठी ११ फेब्रुवारीला निवडणूक होणार असून, गावातील राजकारणी नेते सरपंचपदासाठी पाठबळ मिळविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. कोहळी ग्रामपंचायतचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांच्या सरपंच होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर ग्रामपंचायत सावंगी (तोमर) येथे अनुसूचित जमाती (महिला)साठी सरपंचपद आरक्षित असले तरी, निवडून आलेल्या ९ सदस्यात मात्र या प्रवर्गाचा उमेदवारच नाही. यामुळे येथे उपसरपंच पदासाठी घोडेबाजार होणार आहे.