लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संस्कार भारती विदर्भच्या वतीने गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत विदर्भातील नऊ जिल्ह्यातील २१ तालुक्यात नृत्योत्सवाचा गजर करण्यात येणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा नृत्योत्सव ऑनलाईन माध्यमातून साजरा होणार आहे.
यंदा कोरोना काळामुळे कलावंतांना एकत्रित येण्यावर निर्बंध असल्याने पाडवा पहाट सारखे कार्यक्रम घेता येणार नसल्याने, हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
संस्कार भारती नृत्य विधेच्या आयोजनात विदर्भातील नऊ जिल्ह्यांतील २१ तालुक्यांमध्ये असणारे नृत्य कलावंत यात आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकनृत्य, सिनेनृत्य अशा विविध पद्धतींचा यात समावेश असेल. गुढीपाडवा, १३ एप्रिलपासून रामनवमी, २१ एप्रिलपर्यंत दररोज संध्याकाळी ६ ते ६.४५ वाजेपर्यंत असे पाऊणतास विदर्भ संस्कार भारतीच्या फेसबुक पानावर व यूट्यूब चॅनलवरून हा नृत्य महोत्सव सर्वांना बघता येईल. विदर्भातील शंभराहून अनेक अधिक कलावंत यात आपले नृत्य कौशल्य सादर करणार आहेत.