जिल्ह्यात लागणार १३०७ मशीन : शेतकऱ्यांना आधारशिवाय मिळणार नाही खतलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खत विक्रीतील पारदर्शकतेसाठी आणि अनुदान लाटण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने पॉस मशीनद्वारे खत विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व खत विक्रेत्यांना पॉस मशीन देण्यात येईल. जिल्ह्यात १३०७ पॉस मशीनची आवश्यकता आहे. ४५० मशीन उपलब्ध झाल्या आहेत.केंद्र सरकार खतासाठी अनुदान देते. आजवर कंपनीने खत उत्पादन केले, त्याची माहिती शासनाला द्यावयाची. शासन त्यावर अनुदान मंजूर करून त्याची रक्कम कंपनीकडे जमा करायचे. यामध्ये अनेकदा कंपनीकडून किती टन खत उत्पादन झाले आणि शेतकऱ्यांना किती टन खताची विक्री झाली, याची योग्य आकडेवारी मिळत नव्हती. यामध्ये अनुदान लाटण्याचे प्रकारही घडले. चार वर्षांपूर्वी मोठा अनुदान घोटाळा उघडकीस आला होता. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हेही दाखल झाले होते. खत उत्पादक कंपनीपासून शेतकऱ्यापर्यंतचा खताचा प्रवास पारदर्शी होण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी पॉस मशीनवर खत विक्री प्रणाली शासनाने आणली आहे. आधारकार्डद्वारे शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा करणे, अशी ही योजना आहे. खत घेण्यासाठी शेतकऱ्याला खत विक्री केंद्रावर जात असताना आधारकार्ड घेऊन जावे लागणार आहे. आधारकार्डवरील नंबर आणि शेतकऱ्यांना डाव्या हाताचा अंगठा त्या मशीनवर उठवावा लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्याला खत मिळणार आहे. त्यानंतर तेवढ्या रकमेचे अनुदान कंपनीच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे अनुदानातील भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात, तालुक्यात आणि विक्रेत्यांकडे कोणत्या खताचा साठा किती आहे. याची माहिती शासनाला मिळणार आहे. ज्या भागात खताचा साठा कमी असेल तिकडे जादा साठा असलेल्या भागातून खताची उचल करता येणार आहे. ४५० खत विक्री केंद्रांना पॉस मशीन उपलब्धखरीपाच्या हंगामासाठी शेतक ऱ्यांना १ जूनपासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक खत विक्रेत्यांना एक पॉस मशीन देण्यात येणार आहे. सध्या पावसाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतकरी खत खरेदीकडे फिरकू शकलेला नाही. पेरणी झाली की खतासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडणार आहे. सध्या जिल्ह्यात १३०७ खत विक्री केंद्रे आहेत, यातील केवळ ४५० खत विक्री केंद्रांना पॉस मशीन मिळालेली आहेत. रामटेक, नरखेड, भिवापूर या भागातील विक्री केंद्रांना मशीन उपलब्ध झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी सुबोध मोहरील यांनी दिली.
खतांची विक्री ‘पॉस मशीन’द्वारे
By admin | Updated: June 5, 2017 02:16 IST