कोट्यवधीच्या जमिनीवर कब्जा : ५० लाखांची खंडणी मागितली
नागपूर : कुख्यात गुंड रणजीत सफेलकर याच्या टोळीतील गुंड जितू उर्फ जितेंद्र कटारिया याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. भिलगाव येथील डुमन श्रावण प्रगट (वय ५१) यांच्या ढाबा असलेल्या कोट्यवधीच्या जमिनीवर साथीदाराच्या माध्यमातून कब्जा मारून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने ८ एप्रिलला रणजीत सफेलकर, शरद आणि कालू हाटे तसेच जितेंद्र कटारिया या चाैघांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपींपैकी हाटे बंधू सध्या न्यायालयीन कस्टडीत तर सफेलकर गुन्हे शाखेच्या कस्टडीत आहेत. आरोपी कटारियाला न्यायालयाने २८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कस्टडी मंजूर केली आहे. त्यात त्याने जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी सुरू असताना तपास अधिकारी ईश्वर जगदाळे यांनी आरोपी कटारियाला जामीन मिळाल्यास तो कुख्यात सफेलकरच्या दहशतीचा गैरफायदा उचलून पीडित तसेच साक्षीदारांना धमकावू शकतो, असे सांगितले. त्याला जामीन मिळाल्यास गुन्ह्याच्या तपासावर विपरीत परिणाम होऊ शकतो, हेसुद्धा लक्षात आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने कटारियाचा जामीन अर्ज फेटाळला.
---
बाथोला पाच दिवसांचा पीसीआर
रणजीत सफेलकर टोळीतील दुसरा एक गुंड आणि मनीष श्रीवास तसेच विशाल पैसाडेली या दोघांच्या हत्येच्या वेळी सफेलकरसोबत असलेला गुंड विनय उर्फ गोलू द्वारकाप्रसाद बाथो (४२) याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. दोन्ही हत्याकांडातील त्याच्या भूमिकेची माहिती देऊन पोलिसांनी त्याचा पाच दिवसांचा पीसीआर मिळवला. सफेलकर आणि त्याच्याशी संबंधित सर्व प्रकरणांची सखोल चाैकशी सुरू असून, आणखीही काही खळबळजनक प्रकरण उघड होण्याचे संकेत आहेत, असे गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी लोकमतला सांगितले.
----