एक अनोखा पुढाकार : मुक्या जनावरांच्या सेवेचे व्रतआज जागतिक भटके प्राणी दिनयोगेश पांडे नागपूरआपल्या आजूबाजूला एखादा भटका श्वान दिसला की लगेच बहुतांश जणांच्या तोंडातून ‘हट्’ हाच शब्द बाहेर पडतो. घरातील पाळीव श्वानाचे लाड करत असताना गल्लोगल्ली भटकणाऱ्या मुक्या जनावरांप्रती मात्र ती आत्मीयता दिसून येत नाही. मात्र या भटक्या श्वानांनादेखील हक्काचे घर मिळाले तर ! वाचून आश्चर्य वाटले असेल मात्र नागपुरात भटक्या श्वानांसाठी ‘शेल्टर’ उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या एका तरुणीने यासाठी पुढाकार घेतला आहे. भटक्या श्वानांची संख्या वाढत असताना समाजात अशा ‘शेल्टर्स’ची आवश्यकता निर्माण झाली आहे. अनेक भटके श्वानांची अन्नपाण्याविना वाईट अवस्था होते. त्यातच जर एखादा अपघात झाला किंवा काही कारणाने जखमी झाला, तर श्वानाला त्याच अवस्थेत वेदना सहन करत दिवस काढावे लागतात. एरवी आजूबाजूने हजारो लोक जात असतात, मात्र त्या वेदना कुणाला जाणवत नाही. हीच बाब लक्षात घेऊन स्मिता मिरे यांनी ‘एसएसओ’ (सेव्ह स्पीचलेस आॅर्गनायझेशन) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली व काही तरुण-तरुणींना एकत्र केले. भटक्या श्वानांना हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांनी संकल्पच केला.कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना स्वत:च्या हिमतीवर हजारीपहाड भागात श्वानांचे ‘शेल्टर’ सुरू केले. त्यासाठीदेखील त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सुरुवातीला त्यांना जागाच सापडत नव्हती. अखेर भाडेतत्त्वावर त्यांनी एक पडकी खोली असलेली जागा घेतली. येथे श्वानांसाठी सुमारे १५ पिंजरे बसविण्यात आले. सुरुवातीला काही समाजकंटकांनी त्रास देण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र संकल्प दृढ होता आणि त्यातूनच हा एक अनोखा निवारा उभा झाला. महत्त्वाचे म्हणजे सर्व निधी हा स्मिता मिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत:च्या खिशातून उभारला आहे. श्वानांसाठी जेवण तयार करणे, साफसफाई करणे इत्यादी सर्व कामे संस्थेतील स्वयंसेवक मिळूनच करतात. शिवाय ‘शेल्टर’च्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचे उपक्रमदेखील राबविण्याची सुरुवात झाली आहे.श्वानांसाठी कूलर, ‘सीसीटीव्ही’आजच्या घडीला येथे ३५ हून अधिक भटके श्वान आहेत. यातील अनेक श्वान तर अगदी मरणप्राय अवस्थेत आणल्या गेले होते. येथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार झाले व त्यांच्या खाण्यापिण्याचीदेखील सोय करण्यात आली. उन्हाळ्यात त्यांना त्रास होऊ नये म्हणून पिंजऱ्यांवर हिरवे कापड तर टाकण्यात आले आहेच. शिवाय आता कूलरचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच या ‘शेल्टर’मध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरेदेखील बसविण्यात आले आहेत.भटक्या श्वानांना दया नको, प्रेम हवेहजारीपहाड येथे हे श्वानांचे ‘शेल्टर’ गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. आम्ही कुठल्याही फायद्यासाठी नव्हे तर मुक्या जनावरांपोटी असलेला लळा व सामाजिक जबाबदारीतून हे ‘शेल्टर’ उभे केले. भटक्या श्वानांनादेखील भावना असतात. जिथे ओळखीच्यांनाच भेटायला सवड नाही, तेथे जनावरांकडे कोण लक्ष देणार. काही सहृदयी लोक भटक्या श्वानाला पोळीचे काही तुकडे घालतात. मात्र त्यांना दया नको, हक्काचे घर देण्याची आवश्यकता आहे, असे मत स्मिता मिरे यांनी व्यक्त केले.
भटक्या श्वानांसाठी हक्काचा निवारा
By admin | Updated: April 4, 2017 02:22 IST