१३ कोटींचे नुकसान : सुदैवाने प्राणहानी टळलीनागपूर : कापसी (कळमना) येथील एका आरामशीनला भीषण आग लागून सुमारे १३ कोटी रुपयांचे लाकूड जळून भस्म झाले. आज पहाटे २ वाजता ही भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्या दोन डझन जवानांसह नऊ बंबांच्या साहाय्याने निरंतर प्रयत्नरत आहेत. मात्र, १२ तास होऊनही आग विझविण्यात त्यांना यश आले नाही. यावरून आगीची भीषणता लक्षात यावी.भंडारा मार्गावरील कापसी (खुर्द) येथे फ्रेण्डस टिंबर प्रा. लि. या कंपनीत ही आरामशीन आहे.समीर जयस्वाल, पुनित कोहली यांच्या मालकीच्या या आरामशीन मधून आयातीत लाकडासह (इम्पोर्टेड वूड) सर्वच प्रकारचे महागड्या लाकडाची खरेदी, विक्री अन् कटाईचे काम केले जाते. येथील इम्पोर्टेड टी वूड, सॉन, टिंबरसह कोट्यवधींचे कटसाईज ठिकठिकाणी पाठविले जातात. सुमारे २५ हजार चौरस फुटात आरामशीनचे वेअर हाऊस आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सर्व कामकाज आटोपल्यानंतर जयस्वाल आणि कोहली कार्यालय बंद करून निघून गेले. पहाटे २ च्या सुमारास वेअर हाऊसमधील शेडमधून धूर निघताना दिसल्याने चौकीदाराने तिकडे धाव घेतली. यावेळी त्याला आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी जयस्वाल आणि कोहली यांना फोन करून ही माहिती दिली. अग्निशमन दल आणि पोलिसांनाही कळविण्यात आले. सुमारे अर्धा तास विलंबाने अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, लकडगंजचे स्टेशन ऑफिसर भीमराव चंदनखेडे, कळमना अनिल बरडे, सदाशिव भेंडे, प्रेमराज बरडे यांच्यासह ४0 ते ५0 अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी एकापाठोपाठ तब्बल नऊ बंब घटनास्थळी बोलवून घेतले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. मात्र, सर्वत्र लाकडाचा पसारा असल्याने आग विझण्याऐवजी अधिकच भीषण होत गेली. आरामशीनमध्ये किमती लाकूड ठेवण्यासाठी एक मोठे टिनाचे शेड करण्यात आले होते. हे शेड खाली पडून पुरते खाक झाले.यंत्रणेची धावपळया भीषण आगीमुळे अग्निशमन दलाची मोठी धावपळ झाली. पाण्याचा सारखा मारा करूनही आग विझता विझेना. त्यामुळे पहिल्या दोन तासातच ४ ते ५ टँकर रिकामे झाले. त्यात पाणी भरण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूच्या विहिरी, तलावांवर धाव घेतली. मात्र, पहाटेची वेळ असल्यामुळे टँकरमध्ये पाणी भरणे जमले नाही. शेवटी चार ते पाच किलोमीटर दूर अंतरावरून (नेहमीच्या ठिकाणावरून) अग्निशमन दलाच्या जवानांनी टँकर भरून आणले. ८0 ते ९0 फेर्या पाणी आणल्यानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणेला यश आले नव्हते. दुसरीकडे पाणी आणण्यास विलंब झाल्यामुळे आग अधिकच भडकली.अनेक मान्यवरांची भेटआगीची माहिती कळताच अनेक मान्यवरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यात महापौर प्रा. अनिल सोले यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. वृत्त लिहिस्तोवर आगीचे कारण कळू शकले नाही. (प्रतिनिधी)
कळमन्यात आरामशीनला भीषण आग
By admin | Updated: May 8, 2014 02:38 IST