चंद्रपूर : स्कूल बस वाहनाच्या क्रमांकावर बनावट क्रमांकाची पट्टी लावून ते वाहन उपयोगात आणत असल्याचा प्रकार बल्लारपूर पोलिसांनी उघडकीस आणला. त्यामुळे अशा आणखी काही बसेस रस्त्यावर धावत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पोलिसांनी आता कंबर कसली आहे. दुसरीकडे जप्त केलेल्या बसेसप्रकरणी बल्लारपूर वाहतूक पोलिसांनी आरटीओला पत्र दिले आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह सध्या सुरू असल्याने बल्लारपूर पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत शुक्रवारी एमएच-३५/के-३८६६ क्रमांकाची बालाजी ट्रॅव्हल्सची स्कूल बस जप्त केली. यासोबतच आणखी एक स्कूल बस जप्त केली. जप्त केलेल्या दुसऱ्या स्कूल बसवर एमपी-२२/पी-२४७ असा क्रमांक नमूद होता. परंतु, पोलिसांना शंका आल्याने त्यांनी बारकाईने तपासणी केली असता मूळ क्रमांकावर प्लास्टिक पट्टी चिकटविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ती पट्टी पोलिसांनी काढताच एमएच-४०/७६६४ हा मूळ क्रमांक अस्पष्टपणे दिसून आला. विशेष म्हणजे या दोन्ही बसेस वेकोलि प्रशासन विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी उपयोगात आणत होते. याप्रकरणी फिरोज खान (४३, भगतसिंग वॉर्ड, बल्लारपूर) आणि विनयक श्याम पोलू (२६, रा. सुब्बई, विरुळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सोडून दिले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निरुमणी तांडी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रभाकर जाधव, दिवाकर पवार करीत आहे.बल्लारपूर पोलिसांनी जप्त केलेल्या दोन्ही बसचालकाकडे परवाना कागदपत्रे नव्हती. चालकांकडून मालकाची नावे पोलिसांनी घेतली आहे. त्यांना बयाणासाठी बल्लारपूर पोलीस बोलाविणार असले तरी अद्याप दोन्ही स्कूल बसचे मालक शनिवारी रात्रीपर्यंत बल्लापूर ठाण्यात आलेले नव्हते. भंगारात असलेली वाहने विकत घ्यायची, त्यांची दुरुस्ती करायची आणि बनावट क्रमांक टाकून ती वाहने रस्त्यावर आणायची असा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. बऱ्याचदा एकाच क्रमांकाची दोनपेक्षा अधिक वाहनेही रस्त्यावर उतरविण्यात येतात. अशाचप्रकारे वर्धा येथे काही दिवसांपूर्वी ट्रक जप्त करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकाराची शक्यता अधिक बळावली आहे. त्यादृष्टीनेही बल्लारपूर पोलीस तपास करीत आहे. (विशेष प्रतिनिधी)
स्कूल बसेस बनावट क्रमांकाने धावत असण्याची शक्यता
By admin | Updated: January 25, 2015 00:48 IST