भिवापूर : भिवापूर व कुही तालुक्याला जोडला जाणारा पुल्लर - धामना हा मार्ग सामान्य नागरिकांच्या वेदनांना खुणावणारा ठरला आहे. या मार्गावर सुखकर प्रवासाची गाडी कधी धावणार असा प्रश्न विचारला जात आहे. भिवापूर व कुही या दोन तालुक्यांना जोडणारा पुल्लर - धामना मार्ग येथील नागरिकांसाठी दैनिक प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा मार्ग हा उमरेड - कऱ्हांडला अभयारण्य प्रभावित असला तरी दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी तो सोयीचा आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची दिवसभर वर्दळ असते. मात्र, गत काही वर्षांपासून या मार्गाच्या दुरूस्ती किंवा नूतनीकरणाकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे विकासाच्या बाता मारणारे लोकप्रतिनिधी कुठे गेलेत, असा प्रश्न राजानंद कावळे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित खात्याचे मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता, प्रधान सचिव यांना अनेकदा कळविले. मात्र, मार्गाच्या दुरुस्तीची कायमस्वरुपी उपाय योजना न करता, थातूरमातूर डागडूजी करून लाखो रुपयांची उचल केल्याचा आरोपही त्यांनी केला. एकंदरीत दोन्ही तालुक्यांच्या विकासासह जडणघडणाच्या दृष्टीने सदर रस्त्याचे नूतनीकरण व डांबरीकरण तत्काळ करण्याची मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
पुल्लर-धामना मार्गाची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST