- लॉकडाऊनमुळे ग्राहकी रोडावली : शेतकरी, दलाल, व्यापारी त्रस्त
नागपूर : लॉकडाऊन असतानाही यंदा आंब्याची आवक चांगली आहे; पण मागणीअभावी भाव उतरले आहेत. कळमना ठोक बाजारात भाव कमी असले तरीही किरकोळमध्ये दुप्पट, अडीचपट भावात विक्री होत आहे. लॉकडाऊनमध्ये दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू आहेत. बाजारात विक्री कमी असल्याने किरकोळ विक्रेते मालाची उचल कमी करीत आहेत. यंदा लॉकडाऊनच्या फेऱ्यात सापडलेल्या आंब्याच्या व्यवसायात मंदी दिसून येत आहे.
कळमन्यात आंध्र प्रदेशातील बैंगनफल्ली आंब्याची सर्वाधिक विक्री होते. सध्या आंध्र प्रदेशातून दररोज प्रत्येकी ४ ते ६ टनाच्या आसपास २०० ट्रक बैंगनफल्ली येत आहेत. कळमन्यात २० ते २५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये किलो भाव आहे. याशिवाय तोताफल्ली आंब्याच्या दररोज केवळ १० गाड्या येत आहेत. भाव १२ ते १८ रुपये किलो आहे.
व्यापाऱ्यांनी सांगितले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विदर्भात लंगडा आणि दसेरी प्रजातीच्या आंब्याचे पीक चांगले आले आहे. विदर्भातील हा आंबा कानपूर, अलाहाबाद, मध्यप्रदेश आणि काठमांडूपर्यंत जातो; पण वाहतूक बंद असल्याने जावक बंद आहे. कळमन्यात दसेरी आंबे २५ ते ३५ रुपये आणि लंगडा आंबा दर्जानुसार १५ ते ३० रुपये किलो आहे. दोन्ही आंबे भिवापूर, पवनी, कुही, मांढळ, लाखनी, कोम्हारा, गोंदिया येथून येतात. दसेरीच्या दररोज १० गाड्या (एक गाडी अडीच टन) आणि लंगडा आंब्याच्या सात गाड्या येत आहेत. या आंब्याची जावक बंद आणि विक्री कमी असल्याने भाव उतरले आहेत.
देवगड हापूसदेखील नागपुरात
नागपुरात कोकणचे हापूस आंबे कळमन्यात येत नाहीत. मात्र देवगड-रत्नागिरीहून अनेक जण थेट आंबे मागवत आहेत. या आंब्यांची किंमत पाच डझनाला ३ हजार ६०० ते ४ हजार इतकी आहे. यात वाहतुकदारांचा खर्च देखील समाविष्ट असतो.
आंब्याचा दर (प्रति किलो)
आंबा रिटेल होलसेल
बैंगनफल्ली ७० ते ८० २० ते २५
तोताफल्ली ३५ ते ४० १२ ते १८
दसेरी ६० ते ८० २० ते ३५
लंगडा ५० ते ६० १५ ते ३०
हैदराबादी हापूस ८० ते ९० ३० ते ३५
आवक वाढली, भाव रोडावले
गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व प्रकारच्या आंब्यांची आवक हैदराबाद आणि विदर्भातून वाढली आहे; पण ग्राहकांकडून मागणी नसल्याने भाव रोडावले आहेत. त्यामुळे शेतकरी, दलाल, व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. वाहतूक बंद असल्याने अन्य जिल्ह्यांत आणि राज्यांमध्ये जावक बंद आहे. दुकाने सकाळी ११ पर्यंत सुरू असल्याने किरकोळ विक्रेतेही जोखीम घेण्यास तयार नाहीत. दोन दिवस विक्री होईल, तेवढेच आंबे खरेदी करीत आहेत. त्यामुळे बराच माल कळमन्यात पडून आहे.
ठोकमध्ये आंब्याचे भाव कमीच
यंदा एप्रिल आणि मे महिन्यात सर्व प्रकारच्या आंब्यांची आवक वाढली आहे; पण शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने निराश आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या सीझनमध्ये आंब्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. यंदा कळमन्यात शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साह नाही. लॉकडाऊन हटल्यानंतरच भाव मिळण्याची अपेक्षा आहे.
आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फळे बाजार असोसिएशन.
यंदा आंब्याचा सीझन खराब
अपेक्षित भाव मिळत नसल्याने यंदा आंब्याचा सीझन खराब झाला आहे. हैदराबाद आणि विदर्भातून आवक चांगली आहे. सर्वच जिल्हे आणि राज्यात लॉकडाऊन असल्याने विक्री बंद आहे. परिणामी कळमन्यात भाव कमी झाले आहेत. शिवाय किरकोळ विक्रेत्यांकडून उठाव कमी असल्याचा परिणामही भाव कमी होण्यावर झाला आहे. त्यामुळे नुकसान होत आहे.
पन्नालाल शाहू, ठोक व्यापारी, कळमना मार्केट.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे आंब्याला कमी भाव मिळत आहे. लागवड खर्चापेक्षा उत्पन्न कमी आहे. यावर्षी दसेरी व लंगडा आंब्याचा सीझन चांगला आहे; पण विक्रीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
देवानंद गभणे, शेतकरी, गोंदिया.
उन्हाळ्यात येणाऱ्या दसेरी व लंगडा आंब्याच्या बहरावर शेतकऱ्यांची भिस्त असते. गेल्या वर्षी नुकसान झाले होते. यावर्षी बहर आला; पण भाव मिळत नसल्याने नुकसान होत आहे. शिवाय मालाचे मूल्य वेळेवर मिळण्याची अडचण आहे.
शरद डहारे, शेतकरी, कुही-मांढळ.