नागपूर : जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडच्या मोठय़ा प्रमाणात खाणी आहेत. या खाणीमुळे परिसरातील शेती व नागरिकांच्या आरोग्याला मोठय़ा प्रमाणात क्षति पोहोचत आहे. खाणीतून कोळसा वाहून नेण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असून, परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. जिल्हा प्रशासन आणि वेकोलि नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रकल्पग्रस्त, शेतकरी व परिसरातील नागरिकांनी नागरिक संघर्ष समिती तयार करून वेकोलिच्या विरोधात जनआंदोलन उभारले आहे. येत्या ११ मे रोजी गोंडेगाव खदान येथून आंदोलनाला सुरुवात होणार आहे.पारशिवनी तालुक्यात गोंडेगाव, घाटरोहणा, कामठी, कांद्री, कन्हान या भागात वेकोलिच्या खाणी आहेत. वेकोलिने १९९४ मध्ये जुनी कामठी, घाटरोहणा परिसरातील जमिनी फक्त अग्रिम राशी देऊन अधिग्रहित केल्या. खाणी सुरू झाल्या; मात्र जमिनीची नुकसान भरपाई आजपर्यंत मिळाली नाही. जमीन अधिग्रहित केलेल्या वारसांना नोकरी दिली नाही. वेकोलिद्वारे संपूर्ण परिसरात प्रदूषण करण्यात येत आहे. ११ मे रोजी संपूर्ण कोळशाची वाहतूक बंद पाडणार असल्याचे संघर्ष समितीच्यावतीने आमदार आशिष जयस्वाल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पत्रपरिषदेला अँड. गजानन आसोले, हिरालाल गुप्ता व मोठय़ा प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वेकोलिच्या विरोधात जनआंदोलन
By admin | Updated: May 8, 2014 02:36 IST