कमलेश वानखेडे
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अॅड. अभिजित वंजारी यांच्या पाठीशी उभा राहिलेला ओबीसी फॅक्टर, त्यापाठोपाठ काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेता अशी इमेज असलेल्या नाना पटोले यांची झालेली नियुक्ती या पार्श्वभूमीवर भाजपने नागपूरसह विदर्भात ‘मिशन ओबीसी’ हाती घेतले आहे. पक्षाच्या ओबीसी मोर्चाला अधिक सक्रिय होण्यासह ओबीसी समाज संघटनांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून त्यांना भाजपमध्ये कसे आणता येईल, याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केल्याची उदाहरणे आहेत. ते मुख्यमंत्री असतानाच राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात आले. मात्र, एवढे करूनही एकेकाळी भाजपकडे झुकलेली ओबीसी मतदारांची व्होट बँक आता माघारी फिरू लागली आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीत अभिजित वंजारी यांच्या झालेल्या विजयामुळे भाजपला याची चाहूल लागली व तेव्हाच भाजपने या ओबीसींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. अशात गेल्या आठवड्यात ओबीसी नेते असलेले नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. पटोलेंची नियुक्ती भाजपच्या मिशन ओबीसीमध्ये अडथळा ठरू शकते. यावर उपाय म्हणून भाजपने आपला ओबीसी मोर्चा पुढे करण्याची रणनीती आखली असून, ओबीसी संपर्क अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत ओबीसीमध्ये येणाऱ्या समाज संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या भेटी घ्यायच्या व भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांचे मन वळवायचे, असे नियोजन आहे.
ओबीसीमध्ये सुमारे ३६५ हून अधिक जातींचा समावेश आहे. मात्र, कोणताही राजकीय पक्ष बहुसंख्य असलेल्या तेली, कुणबी, माळी या समाजाला अधिक प्रतिनिधित्व देण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे इतर लहान समाज घटकांवर अन्याय होतो. यावर भाजपने विशेष लक्ष दिले आहे. पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीत ओबीसीमध्ये येणार्या लहान जातीतील सदस्याला स्थान दिले जात आहे. विशेष म्हणजे त्यासाठी एक प्रकारे आरक्षण देऊन जागा राखीव ठेवल्या जात आहेत.
ओबीसी मोर्चा बळकट करणार
- भाजपने आपला ओबीसी मोर्चा अधिक बळकट करून त्याचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. - फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सर्व मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या होतील. मार्चच्या पहिल्या आठवड्यात शहरासह मंडळ कार्यकारिणीची घोषणा केली जाईल. प्रत्येक मंडळावर ३१ सदस्य असतील.
-प्रत्येक बूथवर ओबीसीचे दहा लोक सदस्य केले जातील. प्रत्येक वॉर्डात ११ सदस्यांची कार्यकारिणी असेल.
ओबीसी मतदार भाजपने ओबीसींचे प्रश्न नेहमीच लावून धरले आहेत. ओबीसी मंत्रालय फडणवीस सरकारनेच केले. त्यामुळे ओबीसी मतदार भाजपपासून दुरावण्याचा प्रश्नच नाही. येत्या काळात जास्तीत जास्ती ओबीसी घटकांशी संपर्क साधून त्यांना पक्षाशी जोडण्याचे नियोजन आहे.
- रमेश चोपडे
अध्यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा, नागपूर महानगर