नागपूर : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. माझे वडील रणजित हे देशमुख प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी वेगळ्या विदर्भासंबंधीचा ठराव केला होता, याचे स्मरण करून देत त्या ठरावाचा पाठपुरावा करावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.
महाविकास आघाडीत तीन पक्ष असले तरी त्यात काँग्रेसचा प्रभाव जाणवत नाही. तो जाणवायचा असेल आणि पक्ष संघटनेत प्राण फुंकायचे असतील तर जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विदर्भाचे नाहीत. सिंचन-उद्योगासारखी महत्त्वाची खाती विदर्भाकडे नाहीत. अशा वेळी सर्व क्षेत्रांत विदर्भाला न्याय मिळायचा असेल तर सरकारमध्ये सहभागी असूनही पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसने विदर्भाला झुकते माप मिळवून दिले पाहिजे. पटोले हे विदर्भवादी आहेत. त्यांनी आता स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज बुलंद केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.