नागपूर : काेराेना काळात शाळा बंद असताना पालकांवर लादण्यात आलेले शाळा शुल्क निम्मे करण्याची मागणी पालकांद्वारे केली जात आहे. यासाठी जागरूक पालक संघटनेच्या वतीने रविवारी संविधान चाैक येथे धरणे आंदाेलन करण्यात आले.
संपूर्ण जगात काेराेना महामारीमुळे नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. यापासून भारत देश आणि त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा सुटलेला नाही. जनतेचा या महामारीमुळे रोजगार, व्यापार, नोकरी बंद होत्या, अशा परिस्थितीमध्ये राज्यातील शिक्षण व्यवस्थाही बंदच हाेत्या. त्यानंतर काही काळापासून शिक्षण संस्थांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले, तेही एक तास किंवा ४० मिनिटांसाठी. यावेळी ना शाळांना साेयी-सुविधांसाठी खर्च करावा लागला, ना शिक्षणासाठी. केवळ पालकांनाच इंटरनेटपासून सर्व सुविधा कराव्या लागल्या. असे असताना शाळांकडून १०० टक्के शुल्क वसूल केले जात आहे. यासाठी शाळांकडून कर्मचाऱ्यांमार्फत पालकांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे पालक मानसिक तणावात असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नितीन नायडू यांनी सांगितले. या काळात शाळांना शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना एकतर पगार दिले नाहीत किंवा ५० ते ७० टक्के पगार कापण्यात आला. मात्र, पालकांकडून १०० टक्के शुल्काची अपेक्षा केली जात असल्याचा आराेप नायडू यांनी केला.
अशा वेळी राज्य शासनाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे; पण ताेही मिळत नसल्याची टीका विदर्भ पॅरेंट असाेसिएशनचे संदीप अग्रवाल यांनी केली. सरकारकडून मे महिन्यात एक तकलादू अध्यादेश काढून सरकार चूप झाले आहे. अशात खाजगी शाळा प्रशासनाने सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयात आवाहन दिल्यामुळे निर्णय थांबला. महाराष्ट्र सरकारने ५० टक्के शुल्क आकारणीचा आदेश काढला तर पालकांना दिलासा मिळेल, असे आवाहन आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे यांनी केले.
आंदाेलनाला विदर्भ पेरेंट्स एसोसिएशन, जय जवान जय किसान संघटना, आम आदमी पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, लोकभारती, जागरूक पालक परिषद व लोकजागृती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आदी संघटनांनी समर्थन देत सहभाग घेतला. दिल्ली सरकारप्रमाणे फी कमी करण्याचे अध्यादेश काढावेत आणि विदर्भात तातडीने डीएफआरसीचे गठन करण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. यावेळी भवानीप्रसाद चाैबे, वंचितचे रवी शेंडे, पालक संघटनेचे अजय ताजने, गुल्हाने, याेगेश मानके, प्रशांत नाइक, मंगला गजभिये, मयुरी टेंभरे, फुलचंद नागले, अनुज जैन, अरुण वनकर, ॲड. नीरज खांदेवाले, कविता हिंगल, रमन सेनाड, नरेंद्र तभाने, अशोक मिश्रा, कृतल वेळेकर, पीयूष आखरे, गिरीश तितरमारे, प्रतीक बावनकर, विकास घरडे, नवनीत बेलसरे, विश्वजित मसराम, सुरेश चतुर्वेदी, भूषण ढाकूलकर, विशाल पटले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.