रामटेक : आदिवासी विकास महामंडळाचे भंडारबाेडी (ता. रामटेक) येथे अनेक वर्षांपासून शासकीय धान खरेदी केंद्र सुरू हाेते. ते या वर्षीपासून बेरडेपार येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याला स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांनी विराेध केला आहे.
भंडारबाेडी येथे आदिवासी विकास महामंडळाचे गाेदाम असून, सर्व सुविधा आहेत. धान खरेदी व साठवणुकीची काेणतीही अडचण नसताना येथील खरेदी केंद्र १२ किमी अंतरावर असलेल्या बेरडेपार येथे हलवण्यात आले. भंडारबाेडी परिसर आदिवासीबहुल असल्याने या ठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्र देण्यात आले हाेते. केंद्र बेरडेपार येथे स्थानांतरित केल्याने या भागातील आदिवासी शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी बेरडेपारला जावे लागणार आहे. हे केंद्र राजकीय हस्तक्षेप व सूडबुद्धीने बेरडेपार (ता. माैदा) येथे नेण्यात आल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला असून, त्याच्या स्थानांतरणाला विराेध दर्शविला आहे.