मनपा आयुक्तांनी जारी केले नवीन आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बाजारांमध्ये होत असलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुन्हा एकदा ऑड-ईवन व्यवस्था अंमलात आणली आहे. अत्यावश्यक सेवांशी संबंधित दुकानांसाठीच ही सुविधा लागू राहील. या अंतर्गत पाच झोन अंतर्गत येणाऱ्या बाजारांमधील अत्यावश्यक सेवांशी संबंधित असलेल्या दुकानांनाच त्यांच्या प्रवेशद्वाराच्या दिशेनुसार उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसेच महात्मा फुले मार्केटमधील ओटे धारक व दुकानदारांचेही दिवस निश्चित करण्यात आले आहेत. ओटे धारक व दुकानदारांना सेक्टरमध्ये विभाजित करण्यात आले आहे.
सम (ईवन) - विषम (ऑड) तारीख आणि दुकानांचे प्रवेशद्वार असलेली दिशा यानुसार आता दुकाने उघडतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.. यांनी यासंदर्भात १६ एप्रिल रोजी आदेश जारी केले आहे. आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानांसाठी ही व्यवस्था लागू राहणार नाही. मनपा क्षेत्रासाठी हे आदेश लागू राहतील. ही व्यवस्था मेडिकल दुकानांसाठी सुद्धा लागू राहणार नाही.
विशेष म्हणजे तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुद्धा ऑड-ईवन व्यवस्था लागू केली होती. नंतर याचा खूप विरोधही झाला होता. परंतु सध्या बाजारात होत असलेली गर्दी लक्षात घेता ही व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महात्मा फुले भाजी बाजारात परवानाधारक ६३ दुकानांना सोमवार व मंगळवार, ६० दुकानांना बुधवार व गुरुवार आणि ६२ दुकानांना शनिवार व रविवारी दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकानदारांच्या नावासह मनपाने यादी तयार केली आहे. त्याचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच आलू-कांदे विकणाऱ्या २ दुकानदारांना सोमवार, मंगळवार, आणि २३ दुकानदारांना शनिवार व रविवारी दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
बॉक्स
कोविड नियमांचे काटेकोर पालन व्हावे
ज्या भागातील दुकानांसाठी ही नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. तिथे सातत्याने गर्दी राहते. त्यामुळे प्रशासनाने ही व्यवस्था लागू केली आहे. त्यामुळे दुकानदारांनाही आता कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल. मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक राहील. ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन व्हावे, याची जबाबदारी दुकानदारांवर राहील. ज्या दुकानदारांना ज्या तारखेला दुकान उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यांनी त्याच दिवशी दुकान उघडावी, अन्यथा भादंवि कलम १८८ व इतर नियमानुसार गुन्हा दाखल केला जाईल.
अशी राहील नवीन व्यवस्था
सतरंजीपुरा झोन :
या झोन अंतर्गत येणाऱ्या गोळीबार चौक ते मारवाडी चौक, जुना मोटर स्टँड ते गांजाखेत, गोळीबार चौक पर्यंत अत्यावश्यक सेवांशी संबंधित दुकानांसाठी ही व्यवस्था लागू राहील. संबंधित परिसरातील उत्तर व पूर्व दिशेकडे ज्या दुकानांचे द्वार आहेत ते सम (ईवन) तारखेला सुरू राहतील. तसेच दक्षिण व पश्चिम दिशेने उघडणारी दुकाने विषम (ऑड) तारखेला सुरू राहतील.
धंतोली झोन
या झोन अंतर्गत महात्मा फुले भाजी बाजारातील ठोक भाजी विक्रेत्यांची दुकाने पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत सुरु राहतील. परंतु आलू-कांद्याची दुकाने सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील. यासाठी दुकानांचे नंबरसह दुकान उघडण्याचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. भाजीचे दुकाने सोडून इतर जीवनावश्यक सेवांशी संबंधित दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील.
धरमपेठ झोन
या झोन अंतर्गत रामनगर चौक ते लक्ष्मी भवन चौक मार्गे ट्रॉफिक पार्क रोड आणि गोकुलपेठ मार्केट रोडवरील उत्तर व पूर्व दिशेकडे उघडणारी दुकाने सम तारखेला आणि दक्षिण व पश्चिम दिशेकडे उघडणारी दुकाने विषम तारखेला उघडतील.
आसीनगर झोन
या झोन अंतर्गत इंदोरा चौक ते पाचपावली पोलीस स्टेशन रोडपर्यंतच्या अत्यावश्यक सेवांशी संबंधित दुकानांसाठी नवीन व्यवस्था लागू राहील. यात उत्तर व पूर्व दिशेकडे उघडणारी दुकाने सम तारखेला आणि दक्षिण व पश्चिम दिशेकडे उघडणारी दुकाने विषम तारखेला सुरु राहतील.
मंगळवारी झोन
या झोन अंतर्गत अंतर्गत गड्डीगोदाम गोल बाजार परिसरातील दुकानांसाठी नवीन नियम लागू राहील. यात उत्तर पूर्व दिशेकडे उघडणारी दुकाने सम तारखेला आणि दक्षिण व पश्चिम दिशेकडे उघडणारी दुकाने विषम तारखेला सुरु राहतील.