‘अबोव्ह’ टेंडर रद्द : एक कोटींवरील निविदा राज्यस्तरीय वृत्तपत्रातनागपूर : नासुप्रची कामे जास्त दराने मिळविण्यासाठी रिंग करणाऱ्या कंत्राटदारांच्या लॉबीला नासुप्र विश्वस्त मंडळाने जोरात दणका दिला आहे. १० ते १२ टक्के ‘अबोव्ह’ दराने सादर करण्यात आलेले सर्व टेंडर रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला नासुप्र सभापती प्रवीण दराडे, विश्वस्त आ. दीनानाथ पडोळे, डॉ. छोटू भोयर, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार आदी उपस्थित होते. नासुप्रने सुमारे २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांसाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र, प्राप्त झालेल्या निविदांपैकी एकही निविदा निश्चित केलेल्या दराएवढी नाही. जवळपास सर्वच निविदा १० ते १२ टक्के ‘अबोव्ह’ दराने होत्या. सर्वच कंत्राटदारांच्या निविदा ‘अबोव्ह’ दराने असल्यामुळे कंत्राटदारांनी जास्त दरात कामे मिळविण्यासाठी रिंग केल्याचा संशय विश्वस्त मंडळाला आला. चढत्या दराने कामे मंजूर केल्यास नासुप्रला तोटा होणार होता. त्यामुळे शेवटी नासुप्रचे हित विचारात घेता विश्वस्त मंडळाने सर्व निविदा रद्द केल्या. आता या कामांसाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. एक कोटीच्या वरील कोणत्याही कामासाठी यापुढे राज्यस्तरीय वृत्तपत्रात जाहिरात दिली जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे मोठ्या कामांसाठी चांगले कंत्राटदार येतील व कामाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)
कंत्राटदार लॉबीला नासुप्रचा दणका
By admin | Updated: July 11, 2014 01:26 IST