लोकमत स्पेशल
निशांत वानखेडे
नागपूर : पिण्याच्या पाण्यासाठी भूजल हेच महत्त्वाचे स्राेत आहे. त्यात विहिरींचे महत्त्व माेठे आहे. मात्र नागरिकांची उदासीनता आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे हा महत्त्वाचा स्राेतच निकामी झाला आहे. नागपूर शहरात महापालिकेच्या मालकीच्या ६६६ विहिरी आहेत. त्यापैकी ५० टक्के विहिरी अक्षरश: कचराकुंड्या झाल्या आहेत. २३० विहिरी यामुळे निरुपयाेगी ठरल्या आहेत. केवळ ३० विहिरींचे पाणी पिण्यायाेग्य असून सुस्थितीतील इतर विहिरींचे पाणी दुय्यम कामासाठीच वापरणे शक्य आहे.
हे सर्वेक्षण आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था म्हणजेच नीरीचे. नीरीचे संचालक डाॅ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात आणि वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. अत्या कपले यांच्या नेतृत्वात डाॅ. रिता धापाेडकर, डाॅ. प्रणय तरार, डाॅ. दिव्या कालरा, डाॅ. शैलेंद्र यादव आणि वृक्षसंवर्धन समितीचे बाबा देशपांडे यांच्या टीमने शहरातील झाेननिहाय सर्वच सार्वजनिक विहिरींचे सर्वेक्षण पार पाडले. यामध्ये विहिरी आणि बाेअरवेलचा समावेश आहे. या विहिरी ३ ते १८ मीटरपासून (१० ते ६० फूट) ते ९०० मीटर (३००० फूट) पर्यंत खाेदलेल्या आहेत. नीरीने स्वयंस्फूर्तीने हे सर्वेक्षण केले. यासाठी मनपाकडून विहिरींची यादी घेण्यात आली. त्या प्रत्येक विहिरींवर जाऊन पाहणी आणि आसपासच्या नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. पाण्याचे नमुने घेऊन प्रयाेगशाळेत तपासणी करण्यात आली.
- मनपाच्या नाेंदीनुसार शहरात ६६६ सार्वजनिक विहिरी.
- २३० विहिरी कचरा टाकल्याने निरुपयाेगी झाल्या आहेत. (अस्तित्वच धाेक्यात)
- ३० विहिरींचे पाणी पिण्यायाेग्य. ३६ विहिरी पूर्णपणे दूषित.
- उरलेल्या विहिरींचे पाणी उद्यान किंवा बांधकामासाठी उपयाेगात आणले जाऊ शकते.
- झाेननिहाय विहिरींची संख्या
झाेन विहिरींची संख्या खाेली (मीटर)
१) लक्ष्मीनगर झाेन ७६ ३ ते ८
२) धरमपेठ झाेन ७३ ३ ते ६
३) हनुमाननगर झाेन ७१ २ ते ७
४) धंताेली झाेन ३४ ३ ते ९
५) नेहरूनगर झाेन ९१ ३ ते ९
६) गांधीबाग झाेन ७८ ४ ते ९
७) सतरंजीपुरा ५६ ३ ते ७
८) लकडगंज झाेन ६७ ६ ते ९
९) आसीनगर झाेन ७६ ३ ते ११
१०) मंगळवारी झाेन ४४ २ ते ७
शहरात मनपाद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा हाेताे. तरीही खाेदलेल्या विहिरी हाच भूजलपातळी वाढविण्याचा मुख्य स्रोत आहे. जलवायू परिवर्तन आणि पावसाळ्याच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलाच्या गंभीर परिस्थितीत भूजलपातळी कायम ठेवणे माेठे आव्हान आहे. त्यासाठी शहरातील या विहिरींचे संवर्धन महत्त्वाचे आहे. विहिरींचे पुनरुज्जीवन आणि भविष्यात पाण्याचे नियाेजन करता यावे म्हणून नीरीतर्फे विहिरींच्या सद्यस्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
- डाॅ. अत्या कपले, वरिष्ठ वैज्ञानिक, नीरी