नागनदी पुनरुज्जीवन : वाडी व परिसरातील सिवरेज, कारखान्यातील रासायनिक घटक नदीपात्रात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐतिहासिक ठिकाणासाठी प्रसिध्द असलेल्या उपराजधानीची खास ओळख म्हणजे ‘नागनदी’. वास्तविक आता या नदीचे अस्तित्व शिल्लक नाही. या नदीचा एक गटार नाला झाला आहे. एकेकाळी शहराचे वैभव असलेली नागनदी नागरिकांसाठी जीवनदायिनी होती. १८ व्या शतकात गोंड राजा बख्त बुलंद शाहने आपली राजधानी देवगड (मध्य प्रदेश) छिंदवाडा जिल्ह्यातून वेगळी काढून नागनदीच्या काठावर राजधानी म्हणून नागपूर शहर वसवले. प्राचीन काळी नागनदी काठावर नाग वंशाचे लोक वास्तव्यास असावेत म्हणूनच या नदीचे नाव नागनदी पडले. नागपूर जवळच्या लाव्हा गावानजीकच्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नागनदीवर बिंबाजी भोसले यांनी १७ व्या शतकात अंबाझरी तलाव बांधला, परंतु उगमस्थळापासून तर तलावापर्यंत आज नदीचे अस्तित्व नाही. कारखान्यातील प्रदूषित पाणी व आजूबाजूच्या गावातील सांडपाणी वाहून नेणारी सिवरेज वाहिनी बनली आहे. पुढे अंबाझरी तलावाला सिवरेज साठविले जाते. कारखान्यातील दूषित पाण्यामुळे नदीपात्रात सर्वत्र फेस पसरला आहे. यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे.
.....
अंबाझरी तलावातील पाणी प्रदूषित
ज्या अंबाझरी तलावाच्या पाण्याचा हिंगणा औद्योगिक क्षेत्रासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वापर होतो. त्याच तलावातील पाणी कारखान्यातील रासायनिक घटकांमुळे प्रदूषित होत आहे. कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता नाल्यात सोडले जाते. पुढे अंबाझरी तलावाला मिळणाऱ्या नाल्याला मिळते.
...
वाडी परिसरातील सांडपाणी
वाडी तसेच औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच नाल्यात सोडले जाते. हा नाला अंबाझरी तलावाला मिळतो. पुढे अंबाझरी तलावातून नागनदी वाहते. नदीच्या पाणलोट क्षेत्रातील प्रदूषण थांबल्याशिवाय नदीचे पाणी स्वच्छ होणार नाही. नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविताना याचाही विचार होण्याची गरज आहे.
...
अंबाझरी तलावातील पाण्याला दुर्गंधी
वाडी तसेच हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी अंबाझरी तलावात सोडले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण व दुर्गंधी येत असल्याच्या या परिसरात मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तलावात येणारे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
....
प्रवाह प्रदूषित होण्याची कारणे
- उद्योगांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडणे
- वाडी व एमआयडीसी परिसरात सांडपाणी प्रक्रिया होत नाही.
- नदीच्या पाणलोट क्षेत्रातील गटार नाल्यावाटे नदीपात्रात येते.
- वाडी व परिसरात कचरा संकलन करून प्रक्रिया होत नाही.
- नदीपात्रात कचरा टाकला जातो.
.....