लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : पार्टनरशीपमधील ठेकेदारीत पैशावरून वाद उद्भवला आणि हा वाद विकाेपास गेल्याने एका पार्टनरच्या भाऊ व मुलाने दुसऱ्या पार्टनरचा चाकूने वार करून खून केला. एवढेच नव्हे, तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा मृतदेह गावालगतच्या विहिरीत टाकून त्यावर पऱ्हाट्या व कचरा टाकला. ही घटना खापरखेडा (ता.सावनेर ) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) गावाजवळील शेतात साेमवारी (दि. १२) सकाळी उघडकीस आली असून, पाेलिसांनी एकास अटक केली असून, दाेघांचा शाेध सुरू आहे.
सद्दाम हसनुद्दीन खान (२६, रा. वलनी, ता. सावनेर) असे मृताचे नाव असून, कमलेश शुद्धगाेपाल शुक्ला (४५, रा. वलनी, ता. सावनेर), त्याचा भाऊ भीमलेश शुद्धगाेपाल शुक्ला (४०) व मुलगा अंशू कमलेश शुक्ला (२५) दाेघेही रा.दहेगाव (रंगारी), ता.सावनेर अशी आराेपींची नावे असून, यातील कमलेशला अटक करण्यात आली आहे, तर भीमलेश व अंशू पसार आहेत. सद्दाम व कमलेश यांनी पार्टनरशीपमध्ये सिव्हील कन्स्ट्रक्शनची ठेकेदारी सुरू केली हाेती.
त्यांच्यात मागील काही दिवसांपासून पैशावरून वाद सुरू हाेता. त्यातच सद्दाम हा बुधवार(दि. ७)पासून बेपत्ता हाेता. ताे घरी न आल्याने कुटुंबीयांनी ताे बेपत्ता असल्याची तक्रारी खापरखेडा पाेलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ८) नाेंदविली हाेती. या तक्रारीत त्यांनी घातपाताची शक्यता व कमलेश शुक्लावर संशय व्यक्त केला हाेता. त्यामुळे खापरखेडा पाेलिसांसाेबतच स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. पाेलिसांनी या काळात कमलेशला विचारपूसही केली. मात्र, त्याने पाेलिसांची दिशाभूल केली हाेती. दरम्यान, दहेगाव (रंगारी) गावाजवळील नागपूर-सावनेर मार्गालगतच्या शेतातील विहिरीत साेमवारी सकाळी मृतदेह आढळून आला.
हा मृतदेह सद्दामचा असल्याचे स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी कमलेशला ताब्यात घेत चाैकशी केली. त्याने भाऊ व मुलाच्या मदतीने सद्दामचा खून केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्याला अटक केली. भीमलेश व अंशू पसार असल्याने पाेलीस दाेघांचाही शाेध घेत आहे. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास खापरखेडा पाेलीस करीत आहेत.
...
दुर्गंधीमुळे बिंग फुटले
या शेतातील विहिरीच्या परिसरात दाेन दिवसांपासून दुर्गंधी येत हाेती. या दुर्गंधीची तीव्रता वाढल्याने स्थानिक नागरिकांनी दुर्गंधीचे कारण शाेधायला सुरुवात केली. काहींनी त्या विहिरीत डाेकावूल बघितले असता, त्यांना आत मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्यांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला व ओळख पटल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. ही विहीर आराेपी भीमलेश शुक्लाच्या घराजवळील शेतात आहे.
...
दारू पाजून चाकूने वार
घटनेच्या रात्री कमलेशने सद्दामला त्याच्या दहेगाव (रंगारी) येथील घरी बाेलावले हाेते. ताे घरी येताच, कमलेशने त्याला भरपूर दारू पाजली हाेती. त्यावेळी कमलेशचा भाऊ भीमलेश व मुलगा अंशूही घरीच हाेता. ताे दारूच्या नशेत असताना तिघांनीही त्याच्यावर चाकूने वार केले. त्याचा मृत्यू हाेताच, त्यांनी मृतदेहाला दगड बांधले आणि मृतदेह शेतातील विहिरीत टाकला. एवढेच नव्हे, तर आराेपींनी विहिरीत मृतदेहावर पऱ्हाट्या व काड्याही टाकल्या हाेत्या. पैशाच्या वादातून सद्दामचा खून केल्याचे कमलेशने पाेलिसांना सांगितले असले, तरी हा खून अनैतिक संबंधातून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.